पुणे- मराठा आणि मुस्लिम समाजाला दिलेल्या आरक्षणामुळे जर आम्हाला फायदा होणार असेल तर ती चांगलीच गोष्ट असेल. ताकाला जाऊन भांडं लपविण्याची गरज नाही. या निर्णयाचा आम्हाला फायदा झाला तर मला नवल वाटणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सरकारच्या मराठा व मुस्लिम आरक्षणांबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा समाजाला 16 टक्के तर, मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असताना घेतलेल्या निर्णयाबाबत राज्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याबाबत पत्रकारांनी पवारांना छेडले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पवार सातारा जिल्ह्यातील कराड येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. पवार म्हणाले, ''आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फायदा आम्हाला होणार असेल तर तो फायदा आम्ही घेणारच. या निर्णयाचा फायदा आम्हाला झाल्यास मला नवल वाटणार नाही. शेवटी आम्ही साधू संताची टोळी नाही. निवडणुकीत याचा फायदा आम्ही घेणारच.''
गेली दहा वर्षे केंद्रात कृषिमंत्री राहिलेल्या शरद पवारांना मोदी सरकारबाबतही प्रश्न विचारण्यात आले. मोदी सरकारला आज एक महिना पूर्ण होत आहे. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, मोदींच्या सरकारला केवळ एकच महिना पूर्ण झाला आहे. त्यामुळे सरकारबाबत एवढ्यात मत व्यक्त करणे थोडे घाईचे ठरेल. त्यांना काही काळ व वेळ दिला पाहिजे त्यानंतरच त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करता येईल. मात्र, मागील महिन्याभराच्या कामकाजावरून हे सरकार धरसोड वृत्तीचे असल्याचे दिसून येत आहे असेही मत पवारांनी मांडले.
छायाचित्र- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कराड येथे त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना शरद पवार, सुप्रिया सुळे व मंत्री शशिकांत शिंदे...