आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar's Stand About Giving Support To BJP

पवारांच्या पाठिंब्याची ‘सर्कस’, स्थिर सरकारसाठी भाजपला मदत करण्याचा पुनरुच्चार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - न मागताच भाजप सरकारला पाठिंबा जाहीर करणा-या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी या पाठिंब्याचे समर्थन करण्यासाठी शब्दांची कसरत करतानाच सरकारला पाठिंबा देतानाच आम्ही विरोेधकाची भूमिकाही पार पाडू, असे जाहीर करून आपल्या पक्षाची विश्वासार्हता टिकवण्याचा खेळही खेळला.

राज्यातील सरकार अस्थिर होऊ नये, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. पण, विश्वासदर्शक ठरावावेळी परिस्थिती बघून निर्णय घेण्यात येईल. सरकार पडून लगेचच मतदानाची वेळ येऊ नये, आमची इच्छा आहे. मात्र, एखाद्या विधेयकावर सरकारची भूमिका पटली नाही तर त्याला विरोध करण्याचीही आमची तयारी असेल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी साेमवारी दुटप्पी भूमिका मांडली. अधिवेशनाच्या तिस-या दिवशी होणा-या विश्वासदर्शक ठरावावेळी राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक असू शकेल, असे भासवण्याची कसरतही पवारांनी केली.

महाराष्ट्राच्या ‘हिता’ची काळजी
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ पाहता सत्ता स्थापन करण्याचा दोन्ही काँग्रेaसला अधिकार नाही. या परिस्थिती शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला असता तर सुंठेवाचून खोकला गेला असता. मात्र, सध्या तसे चित्र दिसत नाही. अशा वेळी सध्याचे भाजप सरकार अस्थिर होऊ नये, असे आम्हाला वाटते. कारण सरकार पडून नव्याने निवडणुका व्हाव्यात, अशा मन:स्थितीत राज्यातील जनता नाही. ते महाराष्ट्राला परवडणार नाही. म्हणूनच आम्ही भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

अल्पमतात सरकार चालवणे ही कला
अल्पमतात सरकार चालवणे ही एक कला आहे. ती कला आल्यास कोणतेही सरकार चालवता येते. राज्य तसेच राष्ट्रीय राजकारणात असे किती तरी प्रसंग मी अनुभवले आहेत. भाजप सरकारला पाठिंबा देताना आमची त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही. मात्र, एखाद्या विधेयकाला विरोध असेल तर त्याविरोधात मतदान करण्याचीही आमची तयारी आहे, असेही पवार म्हणाले.

शिवसेनेला टाेला
शिवसेनेच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पवार म्हणाले, ‘कोणाला पाठिंबा द्यायचा आणि कोणाला नाही, हे आम्हाला कोणी सांगू नये. आम्हाला योग्य वाटेल तेच करू. मालेगावप्रकरणी भगवा दहशतवादाचे विधान तसेच इशरत जहाँच्या कुटुंबीयांना दिलेला पाठिंबा हा राज्यापुढील बिकट आव्हानाचा विचार करून घेतलेली भूमिका होती, असेही पवार म्हणाले.

‘नाेटा’चा पर्याय आहेच ना
‘विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदासाठी काेणाला मतदान करणार?’ असा प्रश्न पत्रकारांनी केला. त्यावर ‘याेग्य उमेदवाराला मत देऊ’ असे उत्तर पवारांनी दिले. मात्र पत्रकारांनी पुन्हा खाेलात जाऊन विचारले असता ‘ज्यांचा उमेदवार याेग्य त्यांना मत अन्यथा ‘नाेटा’चा पर्याय आहेच ना’ असे पवार मिश्कीलपणे म्हणाले.