आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar\'s Vote Twice\' Remark News In Marathi

शरद पवार सकृतदर्शनी दोषी, गुरुवारपर्यंत बाजू मांडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/मुंबई - बोटावरची शाई पुसा आणि दोनदा मतदान करा, असा सल्ला देणारे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार या वक्तव्यामुळे गोत्यात आले आहेत. पवारांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे सकृतदर्शनी दिसते, असा ठपका ठेवतानाच यावर गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांनी बाजू मांडावी, अशी नोटीस निवडणूक आयोगाने त्यांना बजावली आहे. यात कसूर झाल्यास पुढील निर्णय घेतला जाईल, असा इशाराही नोटिसीत आहे.

भाजपचे नेते व ईशान्य मुंबईतील उमेदवार किरीट सोमय्या यांनी रविवारी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. सोमवारी त्यांनी पोलिस महासंचालकांची भेट घेतलीच, शिवाय केंद्रीय निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांच्याकडेही तक्रारीचा पाढा वाचला. सोमय्या यांनी पाठवलेल्या व्हीसीडीवरून आयोगाने पवारांना नोटीस बजावली आहे. वक्तव्याचे गांभीर्य जाणवल्याने पवारांनीही तातडीने खुलासा केला होता.
आपण माथाडी कामगारांची गंमत करण्यासाठी असे बोललो होतो, असे पत्रकार परिषद बोलावून त्यांनी म्हटले होते. पण, पवारांच्या या सारवासारवीवर आयोगाने विश्वास ठेवला नाही. खरे काय ते तपासण्यासाठी भाषणाची टेप मागवून आयोगाने घेण्याचे स्पष्ट केले.
पवारांचे वक्तव्य हे बोगस मतदानास प्रोत्साहित करणारे असून, ते गुन्हेगारी स्वरूपाचे आहे. पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याकडून चुकूनही असे वक्तव्य होऊ नये. पूर्वनियोजित व जाणीवपूर्वक अशा या भाषणामुळे त्यांच्यावर लोकप्रतिनिधी तसेच अपराधिक स्वरूपाच्या भादंवि 34, 102 व कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. शिवाय त्यांच्या पक्षाची मान्यताही रद्द केली जावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.

दरम्यान, आम आदमी पार्टीच्या सचिव प्रीती मेनन-शर्मा यांनी सोमवारी मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली. पवारांवर कारवाई करा आणि राष्ट्रवादीची मान्यता रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली.

स्पष्टीकरण देणार : राष्ट्रवादी काँग्रेस
पवारांच्या वक्तव्यावरून चहुबाजूंनी टीकेची झोड उठली. भाजपने हे प्रकरण चांगलेच तापवले. त्यात आपचीही भर पडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही याबाबत सोमवारी बाजू मांडण्यात आली. आयोगाच्या नोटीशीवर दिलेल्या मुदतीत बाजू मांडणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते डी.पी. त्रिपाठी यांनी दिल्लीत पत्रकारांना सांगितले. सहज विनोदाने आपण हे वक्तव्य केल्याचे पवारांनी म्हटले आहे. त्याच पद्धतीने ते घेतले जावे. विपर्यास केला जाऊ नये, असेही त्रिपाठी यांनी म्हटले आहे.

धनंजयच्या वक्तव्यामुळे गोपीनाथ मुंडेही गोत्यात
गेवराई येथे शरद पवारांच्या उपस्थितीत शनिवारी झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी 2009च्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी बोगस मतदान करण्याची जबाबदारी आपल्यावर होती, असे म्हटले होते. त्यावरूनही आपने तक्रार केली आहे. निवडणुकीसाठी 8 कोटी खर्च केल्याचे वक्तव्य करून गोपीनाथरावांनी आयोगाची वक्रदृष्टी ओढवून घेतलेली आहेच, आता धनंजय यांचे वक्तव्यही त्यांच्यासाठी अडचणीचे ठरू शकते.