मुंबई - इंद्राणी मुखर्जी हीच शिना बोराची जन्मदात्री असल्याचे डीएनए चाचणीतून सिद्ध झाले आहे, अशी माहिती मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी सोमवारी रात्री पत्रकारांना दिली.
मारिया म्हणाले, आमच्या पथकाने या प्रकरणातील तिसरा आरोपी संजीव खन्नाला कोलकात्याला नेले आहे. शिनाच्या मृतदेहाची पेणच्या जंगलात विल्हेवाट लावताना संजीव खन्नाने जो बूट वापरला होता तो त्याने कोलकात्यात फेकला होता. दोन्ही बूट जप्त करण्यात आले. शिनाचे काही दागिनेही आमच्या हाती लागले आहेत. आमचे पथक अजूनही पीटर मुखर्जींची चौकशी करत आहे. इंद्राणीच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी सुरू आहे. एखादी महत्त्वाची घडामोड घडली तर त्या वेळी आमचे अधिकारी त्याबाबत माहिती देतील. शिनाचा भाऊ मिखाइल बोरा याच्या डीएनएचे नमुनेही इंद्राणीच्या नमुन्यांशी जुळले आहेत. मिखाइलचा न्यायवैद्यक चाचणीचा अहवाल मुंबई पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. दरम्यान, इंद्राणी मुखर्जी आणि शिना हत्याकांडातील तिसरा आरोपी श्याम राय याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २१ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या दोघांनाही आर्थर रोडच्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
गुंतवणुकीचा अभ्यास
आम्ही न्यायवैद्यक ऑडिटर्स, सी, प्राप्तिकर सल्लागार आणि आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांचे संयुक्त पथक स्थापन केले आहे. ही कंपनी पीटर आणि इंद्राणीच्या भारतातील तसेच ब्रिटन आणि स्पेनमधील विविध कंपन्या, गुंतवणूक आणि मालमत्तांचा अभ्यास करत आहे. हे काम १० दिवसांपासून सुरू आहे, असेही मारिया यांनी सांगितले.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरित...