मुंबई - २६/११ हल्ल्यात पाकिस्ताचा अतिरेकी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबई सीएसटी स्थानकात जो अंदाधुंद गोळीबार केला त्यात शेरूच्या शरीरात तीन गोळ्या घुसल्या होत्या. तातडीने वैद्यकीय उपचार मिळाल्याने शेरूचा जीव वाचला, मात्र अन्ननलिकेत घुसलेल्या गोळीने त्याला तब्बल सहा वर्षे झुंजवले. कसाबची गाेळी झेलूनही त्याने हार मानली नाही, मात्र हृदयविकाराने शनविारी त्याला गाठले, आणि २६/११ चा एक मूक साक्षीदार काळाच्या
पडद्याआड गेला.
शनिवारची सकाळ परळच्या साकरबाई िदनशाॅ पेटीट रुग्णालयासाठी दु:खद ठरली. गेली सहा वर्षे रुग्णालयाचा भाग बनलेला शेरू हा खास पेशंट त्यांना सोडून गेला होता. या लाडक्या पेशंटचे दफन रुग्णालयाच्या आवारात करण्याचा निर्णय झाला. उपचार करणारे डाॅक्टर, त्याची दत्तक पालक एक पारशी लेडी आणि वाॅर्डबाय यांनी शेरूला साश्रुनयनांनी निरोप दिला.
२६/११ ला सीएसटी स्थानकात अतिरेकी हल्ला झाला. त्या वेळी शेरू पार्सल विभागासमोर झोपला होता. अतिरेक्यांच्या तीन गोळ्या त्याच्या शरीरात घुसल्या. निपचीत पडलेल्या या बेवारस कुत्र्याला फोटोग्राफर श्रीपाद नाईक यांनी पाहिले. त्यांनी या गोंधळात पालिकेची रुग्णवाहिका मागवली आणि परळचा पशुवैद्यकीय दवाखाना गाठला. तातडीने शेरूवर शस्त्रक्रिया झाली. तीनपैकी दोन गोळ्या काढण्यात आल्या. श्वासनलिकेतील एक गोळी मात्र काढणे धोक्याचे होते. त्यामुळे तशीच ठेवण्यात आली. त्या एका गोळीला मुक्या शेरूने तब्बल सहा वर्षे झुंजवले.
गेले चार िदवस शेरू आजारी होता. त्याने अन्नपाणी घेणे बंद केले होते. शनविारी सकाळी त्याला हृदयविकारचा झटका आला आणि त्याची प्राणज्योत मालवली. २६/११ च्या हल्ल्यात १६६ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. त्यात आता शेरूचीही भर पडली आहे. दरवर्षी नेमाने २६/११ हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली जाईल; पण शेरूचं काय? या भटक्या-मुक्या प्राण्याच्या लढाईची कोण दखल घेईल? कोण श्रद्धांजली वाहील? हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
छायाचित्रकाराने दिले होते जीवदान
१. ठीक झाल्यावर शेरूला रुग्णालयात अनेकदा पाहण्यास जायचो. तो मला ओळखायचा, अंगावर झेप टाकायचा. तो एक बहादूर कुत्रा होता, असे शेरूला रुग्णालयात दाखल करणारे छायाचित्रकार श्रीपाद नाईक यांनी "दिव्य मराठी'ला सांगितले.
२. हल्ल्याच्या रात्री दोन वाजता शेरूला रुग्णालयात आणले. शेरू आणि आणणारा दोघेही रक्ताने भिजलेले होते. तीन गोळ्या त्याच्या शरीरात खोल घुसल्या होत्या, तरीही तो वाचला. शेवटपर्यंत तो लढला, असे त्याच्यावर उपचार करणारे डाॅ. युवराज कागनिकर म्हणाले.
३. या बेवारस कुत्र्याला दवाखान्यात आणणारा एक प्रेस फोटोग्राफर होता. शेरू असे नामकरण एका पत्रकारानेच केले. शेरू १४ वर्षे जगला. त्याचा रुग्णालयाचा खर्च एक पारशी महिला करत होती. ज्या पिंजऱ्यात शेरूला ठेवले होते. त्यावर ‘२६/ ११ हल्ल्यातील जखमी’ अशी पाटी होती.