आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिधावाटपातील भ्रष्टाचाराची राज्य सरकारकडून कबुली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील काही जिल्ह्यांत आणि तालुक्यांतील शिधावाटपात काळाबाजार होत असल्याची कबुली अन्न आणि नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. आमदार नाना पटोले यांनी रॉकेल आणि साखरेचे वाटप होत नसल्याबाबत विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात देशमुख यांनी ही कबुली दिली.
रॉकेल साठय़ात कपात झाल्याबाबत आमदार पटोले यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत देशमुख यांनी म्हणाले की, राज्यात गॅस कनेक्शन्सची संख्या वाढल्याने रॉकेल साठय़ात कपात केली आहे. राज्यात 180 लाख गॅस कनेक्शनधारक नागरिक आहेत. ज्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांच्या अनधिकृत जोडण्या असतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. यावर आमदार नाना पटोले यांनी लाखांदूर आणि साकोली तालुक्यांमध्ये साखर आणि रॉकेल मिळत नसल्याचे निदर्शनास आणून देताच तेथील अधिकार्‍यांना निलंबित करून कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी दिले. तर रॉकेलच्या वाढत्या भ्रष्टाचाराबाबत जिल्हाधिकार्‍यांना सूचना देणार असून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे देशमुखांनी सांगताच विरोधकांनी गोंधळ घातला, भ्रष्टाचार मान्य करणार्‍या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार बाळा नांदगावकर यांनी केली. यावर हा प्रश्न अत्यंत गंभीर असून सरकारने जबाबदारीने उत्तरे द्यावीत, असे सांगून अल्पकालीन चर्चा केली जावी, असे निर्देश विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिले.