आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिना Murder Case: पीटरवरही हत्येचा गुन्हा दाखल, इंद्राणी म्हणते माझा काहीच संबंध नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंद्राणी आणि तिचा तिसरा पती पीटर मुखर्जी - Divya Marathi
इंद्राणी आणि तिचा तिसरा पती पीटर मुखर्जी
मुंबई- शिना बोरा हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या इंद्राणीचा तिसरा पती पीटर मुखर्जीवर सीबीआयने हत्येचा आरोप ठेवला आहे. गुरुवारी दिवसभर सीबीआयने केलेल्या चौकशीनंतर पीटरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत सीबीआय कोठडी देण्यात आली. शिना बोरा हत्याकांडात पीटरचाही सहभाग होता, असा दावा सीबीआयच्या वतीने न्यायालयात करण्यात आला.
पीटरच्या अटकेनंतर शिना बोरा प्रकरणाला आता नवे वळण लागले असून ज्या दिवशी शिनाची हत्या झाली, त्या २४ एप्रिल २०१२ रोजी संपूर्ण दिवसभर तसेच त्याअगोदर आणि नंतर दोन-तीन दिवस पीटर आणि इंद्राणी फोनच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. सीबीआयचे वकील अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंह यांनी महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर ही माहिती दिली.
तसेच याप्रकरणी पीटरची अधिक चौकशी गरजेची असून त्याला १४ दिवसांची सीबीआय कोठडी देण्याची मागणीही त्यांनी केली. महानगर दंडाधिकाऱ्यांनी हे प्रकरण आता मुंबई सत्र न्यायालयाकडे वर्ग केले असून इंद्राणी, संजीव खन्ना आणि श्यामवर राय या तिघांना ३ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पीटरला फक्त चौकशीला बोलावण्याशिवाय मुंबई पोलिसांनी काहीही केले नाही. त्यामुळे २ आयपीएस आणि ५ ते ६ पोलिस दलातील अधिकाऱ्यांचीही चौकशी होऊ शकते.

प्रकरणात गोवण्यात आले : इंद्राणी मुखर्जी
आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसून मला याप्रकरणी हकनाक गोवण्यात आल्याचा दावा प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने केला आहे. तुरुंगातून न्यायालयात हजर करण्यासाठी नेत असताना प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना इंद्राणीने ही प्रतिक्रिया दिली, तर आपल्या वडिलांना या हत्येची कल्पना होती, हे ऐकून आणि त्यांच्या अटकेने आपल्याला जबर धक्का बसल्याची प्रतिक्रिया पीटर मुखर्जीचा मुलगा राहुल यांनी न्यायालयाबाहेर दिली. राहुलचीदेखील सीबीआयने तब्बल बारा तास नव्याने चौकशी केली.