आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'भू-संपादना\'वरून शिवसेनेकडून भाजपचे पुन्हा वाभाडे, शेतक-यांचा शाप घेऊ नका!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्रात व दिल्लीत सरकारात सहभागी असूनही आमचा भूसंपादन विधेयकांला विरोध कायम आहे. पण ही भूमिका घेताना शिवसेना ढोंग करीत नाही. आम्ही जे केले ते केले एका प्रामाणिक भावनेने केले. शेतक-यांकडे मते मागायची, त्यांना स्वप्ने दाखवायची, भरमसाट आश्‍वासने द्यायची व सत्ता येताच त्यांच्या जमिनीचा तुकडा त्यांच्या परवानगीशिवाय हिसकावून घ्यायचा. हे पाप शिवसेना कदापि करणार नाही. कायदा तुमचा असला तरी आमचा वायदा शेतकर्‍यांशी आहे. शेतकर्‍यांचे शाप घेऊन कोणालाही सुखाची झोप येणार नाही असे सांगत शिवसेनेने भाजपचे पुन्हा एकदा वाभाडे काढले आहेत. तसेच भाजपने भूसंपादन विधेयकात पुन्हा सुधारणा केली असली तरी सेनेचा विरोध कायम असल्याचे 'सामना'त अग्रलेख लिहून शिवसेनेने स्पष्ट केले आहे.
प्रस्तावित भू-संपादन विधेयकाला सर्वच राजकीय पक्षांनी विरोध केल्यानंतर दिल्लीतील नरेंद्र मोदी सरकारने या विधेयकात 6 बदल केले आहेत. त्याचबरोबर बहुमताच्या जोरावर मोदी सरकारने हे विधेयक लोकसभेत मंजूर केले आहे. मात्र, विरोधी पक्षांसह भाजपच्या मित्रपक्षांचेही समाधान झालेले नाही. अकाली दल व शिवसेना या मित्रपक्षांनी मोदी सरकारने सादर केलेल्या भूसंपादन विधेयकाला विरोध कायम ठेवला आहे. याबाबत शिवसेनेने पुन्हा एकदा पक्षाचे मुखपत्र 'सामना'त अग्रलेख लिहून भाजपवर शरसंधान साधले आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, भूमी अधिग्रहण कायदा लोकसभेत मंजूर झाला, पण हाती बहुमताचा आकडा असूनही सरकारला मेहनत करावी लागली. अनेकांच्या नाकदुर्‍या काढाव्या लागल्या. राजकीय लेनदेन तर झालीच असणार, पण शिवसेना शेतकर्‍यांच्या बाजूने ठाम उभी राहिली. शेतकरीविरोधातील कोणत्याही कायद्याचे समर्थन शिवसेना करणार नाही, हा आमचा शब्द होता व दिलेल्या शब्दास जागण्याची आमची परंपरा आहे. आमची बांधिलकी कष्टकर्‍यांशी आहे. शिवसेनेच्या खासदारांनी मतदानात भाग घेतला नाही. शेतकर्‍यांच्या गळ्याभोवती फास आवळला जात असताना त्या फासाचा खटका ओढण्यासाठी ज्यांचे हात सरसावले त्यात शिवसेनेचे हात नव्हते, याची नोंद इतिहासात राहील. आधीच शेतकर्‍यांचे जगणे हे मरणाइतकेच भयंकर बनले आहे. त्या मरणाची तिरडी बांधणारे हे भूमी अधिग्रहण विधेयक ठरणार आहे. शिवसेना शेतकर्‍यांच्या बाजूने आहे याचा अर्थ आम्ही उद्योग व विकासाचे शत्रू आहोत असा नाही. शिवसेना उद्योग-व्यापार वाढून देश आर्थिक सक्षम व्हावा या मताची आहे. उद्योग वाढला तर रोजगार वाढेल. रोजगारातून संपन्नता येईल, पण शेतकर्‍यांचे गळे कापून व त्यांच्या रक्तातून मूठभर उद्योगपतींचे विकास मळे फुलणार असतील तर ते आम्ही कसे मान्य करणार? महाराष्ट्र शेतकरी व कामगार वर्गाच्या कष्टातून आणि घामातून निर्माण झाला आहे. महाराष्ट्र हे जात्याच पुरोगामी व विचाराने पुढारलेले राज्य आहे, असे सांगत शिवसेनेने मोदी व भाजप सरकारला जो द्यायचा तोच इशारा दिला आहे.
पुढे वाचा, शिवसेना म्हणते, ...तर आम्ही शिवराय, शाहू, फुले व आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे नाव घेण्याच्या लायकीचे नाही!