आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्लेषण: MIMच्या आडून भाजपवर कुरघोडी करण्याचा शिवसेनेचा डाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असल्याने या दोन्ही पक्षांवर राज्यात कायदा व सुव्यवस्था उत्तम कशी राहील अशी संयुक्तपणे जबाबदारी असताना शिवसेनेने एमआयएमचे खासदार असाऊद्दीन ओवेसी यांच्या पुण्यातील सभेला जाहीर विरोध करून नवा वाद निर्माण केला आहे. मुस्लिम आरक्षण परिषदेला ओवेसी तडाखेबाज भाषण ठोकणार असल्याची कुणकुण सेनेला लागताच उद्धव ठाकरेंनी हिंदुंच्या विरोधात अपशब्द काढल्यास थेट सभा उधळून लावा असे आदेश दिले. थेट पक्षप्रमुखांनीच तसे आदेश दिल्याने शिवसैनिकांनी आपण राडाबाजी करण्यास तयार असल्याचे दाखवून दिले. मात्र, यामागे शिवसेनेचा उद्देश केवळ मुस्लिमांना किंवा ओवेसींना विरोध करण्याचा नसून सहकारी मित्र भाजपला अडचणीत आणण्यासाठी ही खेळी असल्याचे जानकारांचे म्हणणे आहे.
विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी दगाबाजी करून भाजपने शिवसेनेला धोबीपछाड दिला व सत्ता खेचून आणली. त्या दिवसापासून उद्धव यांनी सावध पावले टाकत राजकारण करण्यास सुरुवात केली. आपला विरोधक आता काँग्रेस-राष्ट्रवादी-मनसे नसून, 25 वर्षाचा मित्रपक्ष भाजपच असल्याचे सेनेला वाटू लागले. भाजपनेही विधानसभा जिंकल्यावर आता राज्यातील प्रमुख शहरांतील महानगरपालिका स्वबळावर लढविण्याचे संकेत दिले आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपने प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे यांची निवड केली गेली व त्यांनीच सूत्रे स्वीकारताच भाजपची जेथे जेथे ताकद आहे तेथे पक्ष स्वबळावर लढेल हे सांगितले. यातून शिवसेनेने काय घ्यायचा तो अर्थ घेतला व सेना लागलीच कामाला लागली. येत्या काही काळात व पुढील दीड-दोन वर्षात राज्यातील मुंबईसह पुणे, नाशिक, नवी मुंबई, औरंगाबाद, ठाणे यासारख्या मोठ्या पालिकांची निवडणूक होत आहे. शिवसेना या भागात अधिक सक्रिय आहे. मात्र, याच भागात भाजपने जोर लावला आहे. त्यामुळेच भाजपने इतर पक्षांतील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटाच लावला गेला आहे. शहरी भागातून भाजपला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून मुंबईतील प्रकाश दरेकर, नाशिकचे वसंत गिते यांच्यासह अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे अस्वस्थ आहेत. त्यामुळेच शिवसेना सत्तेत असूनही भाजपला लक्ष्य करू लागली आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून असो की उद्धव यांच्या प्रतिक्रिया थेट भाजपवर हल्लाबोल करणा-या ठरत आहेत.
भाजपचा सक्षमपणे मुकाबला करता यावा म्हणून उद्धव मोठ्या ताकदीने संघटन वाढवत आहेत. त्यामुळेच सेना सोडून गेलेल्या नेत्यांना पक्षात आणण्यासाठी उद्धव यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळेच शुभा राऊळ असो की राणेंचे समर्थक असलेल्या विनायक निम्हणसारख्या अनेक नेत्यांना पक्षात आणले जात आहे. कोकणातही शिवसेनेची मोठी ताकद वाढली आहे. भाजपची गड असलेल्या विदर्भात उद्धव यांनी नुकतेच सर्व खासदार व आमदार यांना लोकांच्या भेटीगाठीसाठी दौ-यावर पाठविले होते व आणखी काही नेत्यांना पाठवले जाणार आहे. त्यावरून उद्धव यांनी भाजपला टक्कर देण्याची तयारी ठेवल्याचे दिसून येत आहे.
विनायक निम्हणांना प्रवेश करताच शहरप्रमुखपद बहाल- नारायण राणेंचे एकेकाळचे समर्थक विनायक निम्हण यांची 9-10 वर्षानंतर सेनेत घरवापसी झाली आहे. तीन टर्म आमदार राहिलेल्या निम्हण यांना भाजपच्या उमेदवाराने दारूण पराजित केले. काँग्रेस पक्षाला फारसे भवितव्य नाही व आपले गॉडफादर राणेंनाही तेथे किंमत नसल्याने निम्हण अस्वस्थ होते. त्यांनी भाजपातही जाण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिक नेत्यांनी विरोध केला. त्यामुळे निम्हण यांनी थेट उद्धव ठाकरेंशी संपर्क साधून भेटीची वेळ मागितली व सेनेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. उद्धव यांनीही पुण्यासारख्या शहरातील ताकदीचा नेता पक्षात परत असल्याने तत्काळ होकार देत 24 तासांच्या आत पुणे शहरप्रमुखपदाची बक्षिसी दिली. निम्हण मराठा समाजाचे असून त्यांच्यामागे मोठी आर्थिक ताकद असण्यामागे कार्यकर्त्यांचेही जाळे आहे. त्यामुळे पुणे महापालिकेत भाजपला पाणी पाजायचे असल्यास निम्हणांसारखा नेता हवा हे उद्धव यांनी क्षणात ताडले व पुण्याची संपूर्ण जबाबदारी दिली. निम्हण यांच्याकडे जबाबदारी येताच पुणे शहरात मुस्लिम आरक्षण परिषदेने ओवेसींच्या उपस्थित आरक्षण मागणीसाठी कार्यक्रम घेण्याचे ठरविले. मात्र, शिवसेनेने त्याला तत्काळ विरोध करतानाच भाजपवर कुरघोडी केली आहे. ओवेसी हे हिंदुविरोधी वक्तव्य करण्यासाठी पटाईत मानले जातात. त्यामुळे हिंदुविरोधी वक्तव्य कराल तर सभा उधळून टाकण्याचे आदेश उद्धव यांनी निम्हण आणि त्यांच्या टीमला दिले. निम्हण यांनाही अशा चमकोगिरी करून प्रसिद्धीच्या झोतात यायचेच होते. त्यामुळे एमआयआयच्या माध्यमातून शिवसेनेने भाजपलाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.