आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीतल म्हात्रे, शुभा राऊळ राष्ट्रवादीच्या वाटेवर, सुप्रिया सुळेंनी घेतली भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे व माजी महापौर व विद्यमान नगरसेविका शुभा राऊळ पक्षात नाराज आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली. दरम्यान, या भेटीनंतर राऊळ व म्हात्रे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगू लागल्या आहेत. सुप्रिया सुळेंनी मात्र ही राजकीय भेट नसल्याचे म्हटले आहे.
शीतल म्हात्रे आणि राऊळ यांनी आपल्याच पक्षातील नेते व आमदार विनोद घोसाळकर यांच्याविरोधात गंभीर आरोप करीत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसेच पक्षाने दखल घ्यावी व घोसाळकरांविरूद्ध कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी केली होती. मात्र, पक्षाच्या पातळीवर त्याकडे दुर्लक्ष केले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याबाबत बोलताना म्हटले होते की, हा प्रश्न आमचा अंतर्गत आहे तसेच त्यात कोणीही लु़डबूड करू नये.
यानंतर म्हात्रे यांनी आपल्या नगरसेविकापदाचा राजीनामा देऊ केला होता. मात्र उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरेंनी फोनवर चर्चा करून राजीनामा देऊ नये असे सांगितले होते. तसेच दोषी आढळल्यास कारवाई करू असे आश्वासन दिले होते. मात्र, या प्रकरणी ना चौकशी झाली ना पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. त्यामुळे नाराज झालेल्या शीतल म्हात्रे आणि शुभा राऊळ इतर पक्षात जाणार असल्याची चर्चा सेनेच्याच नेत्यांनी सुरु केल्या. दरम्यान, या सर्व प्रकरणानंतर शुक्रवारी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व जितेंद्र आव्हाड यांनी शीतल म्हात्रे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यावेळी माजी महापौर शुभा राऊळही उपस्थित होत्या. त्यानंतर या दोघी राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या वावड्या उडाल्या आहेत. मात्र सुप्रिया सुळे यांनी ही राजकीय भेट नसल्याचे म्हटले आहे. शुभा राऊळ आणि माझे अनेक वर्षापासूनचे संबंध आहेत. त्यामुळेच झाल्या घटनेबाबत भेटून माहिती घेतली.