आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sainik Runing The Manohar Joshi From Dashara

मनोहर जोशींना शिवसैनिकांनी दसरा मेळाव्यातून पिटाळले,ठाकरेंवरील टीका पडली महागात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दोन दिवसांपूर्वी शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जाहीरपणे टीका करणारे शिवसेनेच्या थिंक टँकमधील ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना रविवारी शिवसैनिकांनी दसरा मेळाव्यातून अक्षरश: पिटाळून लावले. दरम्यान, जोशी यांच्या निवासस्थानाभोवती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे आणि त्यामुळेच महापौर, मुख्यमंत्री ते लोकसभेचे अध्यक्ष असा अफलातून प्रवास करणारे जोशी यांना व्यासपीठावर शिवसैनिकांच्या संतापाचा सामना करावा लागला. शिवसेनेच्या 48 व्या दसरा मेळाव्यासाठी जोशी उद्धव यांच्यानंतर व्यासपीठावर आले. तेव्हा शरद पोंक्षे यांचे भाषण सुरू होते. जोशी येताच ‘मनोहर जोशी चले जाव’, ‘मनोहर जोशी हाय हाय’, अशा घोषणाबाजीने शिवाजी पार्कचे मैदान शिवसैनिकांनी दणाणून सोडले. त्यामुळे पोंक्षे यांना भाषण बंद करावे लागले. दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघातून पक्षाची उमेदवारी मिळत नसल्याने जोशी सध्या नाराज असल्याचे मानले जाते.

उद्धव आणि आदित्य ठाकरे, एवढेच नव्हे रश्मी ठाकरे यांनीही शिवसैनिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. शांत राहावे, असा उद्धव यांचा आदेश असल्याचे माईकवरून वारंवार सांगितले जात होते. परंतु शिवसैनिकांचा रोष वाढत चालला होता. ते पाहून अखेर मनोहर जोशी उठले. शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी ते उठले असावेत, असे वाटत असतानाच लीलाधर डाके त्यांना घेऊन व्यासपीठाच्या पायर्‍यांपर्यंत गेले. तेथे काही क्षण डाके यांच्याशी बोलून जोशी यांनी काढता पाय घेतला.

बाहेर पत्रकारांशी बोलताना जोशी यांनी सांगितले की, ‘गैरसमजातून हा प्रकार घडला आहे. माझा शिवसेनेवर राग नाही. कधीही नव्हता आणि आताही नाही.’ भर सभेत व्यासपीठावरून हाकलून दिलयाचे दु:ख त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते.


हर्षवर्धन जाधव शिवसेनेत
कन्नड येथील मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी रविवारी दसरा मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला.