आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनाही सरकारला खिंडीत गाठणार; सत्तेपेक्षा शेतकरी कर्जमाफी महत्त्वाची : दिवाकर रावते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षेप्रमाणे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीचे पडसाद  उमटले. विराेधकांच्या गाेंधळामुळे पाचही दिवस विधिमंडळाच्या दाेन्ही सभागृहांचे कामकाज हाेऊ शकलेले नाही. अाता बुधवारपासून सुरू हाेत असलेल्या दुसऱ्या अाठवड्यातही हा गाेंधळ कायम राहील. मात्र अाता सरकारला खिंडीत गाठण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेनेच पुढाकार घेतला अाहे. 

उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आल्याने तिथे या पक्षाला कर्जमाफीचे अाश्वासन पूर्ण करावे लागेल. मग जर तिथे कर्जमाफी हाेऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही, हा मुद्दा उपस्थित करून भाजपची अडचण करण्याची रणनीती शिवसेनेेने अाखली अाहे. ‘शेतकरी कर्जमाफी हा आता राष्ट्रीय विषय झाल्याने भाजपला निर्णय घ्यावाच लागेल. जाेपर्यंत निर्णय हाेत नाही ताेपर्यंत कामकाज चालू देणार नाही,’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते व परिवहन राज्यमंत्री दिवाकर रावते यांनी दिली. दुसरीकडे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व धनंजय मुंडे यांनीही कर्जमाफीसाठी अापण अाग्रही राहणार असल्याचे नमूद केले अाहे.  

उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आल्यास शेतकरी कर्जमाफी करू, असे भाजपने जाहीर केले होते. त्याच धर्तीवर राज्यात सत्ता असल्याने भाजपने कर्जमाफी करावी, अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादीने केली होती. यासाठी राज्यपालांचीही त्यांनी भेट घेतली होती. दिवाकर रावते यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकरी कर्जमाफीची मागणी केली होती.  

दिवाकर रावते यांनी सांगितले, ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळाच्या काळात जेव्हा ग्रामीण भागात फिरत होते तेव्हाच त्यांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी केली होती. शेतकरी कर्जमाफी ही आमचीच मागणी आहे. गेल्या चार-पाच अधिवेशनांत आम्ही ही मागणी लावून धरली होती. उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये जेव्हा भाजपने कर्जमाफीचे आश्वासन दिले तेव्हा तो राष्ट्रीय विषय झाला. आमच्या मागणीला नौटंकी म्हणणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने आता याचा फायदा घेण्यासाठी कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे,’ असेही ते म्हणाले.
   
विराेधकांची अाज बैठक  
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, ‘शेतकरी कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन हीच योग्य वेळ अाहे. विरोधी पक्ष या मागणीसाठी अधिक आक्रमक होणार अाहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी बुधवारी सकाळी दहा वाजता एका बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी अधिक आक्रमक रणनीतीबाबत चर्चा केली जाणार आहे,’ असेही ते म्हणाले.  

कर्जमाफीसाठी हीच वेळ याेग्य  
मागील अडीच वर्षांत महाराष्ट्रात सुमारे नऊ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. आत्महत्यांचे प्रमाण कमी होत नसल्यामुळे कर्जमाफीची घोषणा करण्यात सरकारने अधिक वेळकाढूपणा करू नये. मुख्यमंत्री मागील एक वर्षापासून योग्य वेळी कर्जमाफी करण्याचे आश्वासन देत आहेत. परंतु त्यांच्या योग्य वेळेचा मुहूर्त अद्याप उजाडलेला नसल्याने रोज अनेक हतबल शेतकरी आत्महत्या करीत आहेत. कर्जमाफी करण्यासंदर्भात सरकारची भूमिका प्रामाणिक असेल तर यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापेक्षा दुसरी कोणतीही अधिक योग्य वेळ असू शकत नाही.  
- राधाकृष्ण विखे पाटील, विराेधी पक्षनेते, विधानसभा

भाजपने कर्जमाफीचे ‘कमळ’ द्यावे  
अाजवर अाम्ही कर्जमाफीची मागणी केली, मात्र सत्तेत असल्याने आक्रमकतेला मुरड घातली होती.  परंतु आता मात्र आम्ही आणखी आक्रमक होणार आहोत. उद्धव ठाकरे यांच्या मागणीला आता भाजपसह सर्वच पक्षांचा पाठिंबा मिळतोय याचा आनंद आहे. ग्रामीण भागात आपले काय होईल अशी भीती वाटल्यानेच भाजपही आता कर्जमाफीसाठी आमच्यासोबत आला आहे. आणि त्यामुळेच आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी नक्कीच मिळवून देऊ. भाजपने कर्जमाफीचे कमळ उद्धव ठाकरे यांना आता द्यावे. 
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री तथा शिवसेना नेते
बातम्या आणखी आहेत...