आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे रोखठोक सवाल, भाजपचा दुहेरी कावा कायम!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेनेशी जाहीर व मनसेशी छुपी आघाडी करण्याचा भाजपचा डाव जिव्हारी लागल्याने शिवसेनेने भाजपवर तोफ डागत त्यांना फैलावर घेतले. राज्यात भाजपचे निर्णय नक्की कोण घेतो? तसेच मनसेचा पाठिंबा घेणार का? अशी प्रश्नांची सरबत्ती करत उत्तरे न मिळाल्यास शिवसैनिकांशी बोलून योग्य तो निर्णय घेऊ, असा गर्भित इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिला. त्यावर भाजपने समजावणीच्या सूर लावला, पण कावेबाजपणाही दाखवून दिला. प्रदेशाध्यक्ष या नात्याने राज्यात देवेंद्र फडणवीस यांनाच निर्णयाचे अधिकार आहेत, असे स्पष्ट करून कुठल्या पक्षाचा पाठिंबा घ्यायचा यावर आताच काहीही न बोलणे उचित ठरेल, असे भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रूडी यांनी नंतर पत्रकारांना सांगितले.

नितीन गडकरींची राज ठाकरे भेट, नंतर मनसेने शिवसेनेविरुद्ध उमेदवार देण्याचा निर्णय घेत मोदींना पाठिंबा देण्याची घोषणा केली. यामुळे युती तुटण्याची स्थिती निर्माण झाली. त्यावर उद्धव यांनी नेत्यांची बैठक घेऊन मंगळवारी माध्यमांसमोर भूमिका मांडली. त्यातच भाजपने तातडीने रूडी यांना मातोर्शीवर धाडले.

गडकरी यांना टोला, युतीत बिब्बा घालणारे नकोत
मुंडे व फडणवीसांसोबत महायुतीची वाटचाल योग्य चालली होती. मध्येच कोणी येऊन बिब्बा घालणे खपवून घेतले जाणार नाही. चांगले चालल्यावर कोणीही मिठी मारायला येईल. पण तुम्ही कोणाला मिठी मारायची हे आधी ठरवा, असा टोला उद्धव यांनी गडकरींना लगावला.

शिवसैनिकांशी बोलून निर्णय, उद्धव यांचा सूचक इशारा!
भाजपचे निर्णय कोण घेतो व मनसेचा पाठिंबा घेणार का, याची उत्तरे मित्रपक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आम्हाला मिळावीत. भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस सकाळी भेटले. युती अभेद्य राहील, असे ते म्हणाले. राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांच्याशीही चर्चा झाली. आता शिवसैनिकांशी बोलून पुढचा निर्णय घेऊ, असा सूचक इशाराही उद्धव यांनी दिला.

राज यांच्यावर हल्ला मतांसाठी मोदींचा मुखवटा
चांगले चाललेले दिसताच कुणी चिकटण्याचा प्रयत्न करणारच. कारण आपल्या ताकदीवर मते मिळणार नाहीत, हे त्यांना माहीत आहे. म्हणूनच मोदींचा मुखवटा घालून मते मागणार आहेत. पण मराठी माणूस खुळा नाही, अशा शब्दांत उद्धव यांनी राजवर हल्ला चढवला.

राज यांनी मोदींना पाठिंबा देण्यात गैर काय : रविशंकर प्रसाद
नवी दिल्ली- राज यांना काय वाटते? तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मात्र, त्यांच्याशी व त्यांच्या मनसेशी आमचा संबंध नाही. मोदी पंतप्रधान व्हावेत असे राहुल गांधी यांच्या जवळ वावरणार्‍यांनाही वाटते. राज यांना तसे वाटल्यास गैर काय, असे मत भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले. गडकरींनी राज यांच्या भूमिकेचे स्वागत केल्याबाबतच्या प्रश्नावर मात्र प्रसाद यांनी मौन बाळगले.