मुंबई - ‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र नाही. गुजरातींबाबत त्यात मांडण्यात आलेल्या भूमिकेशी आमचा पक्ष सहमत नाही,’ अशी प्रतिक्रिया
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र व युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देत गुजराती समाजात उफाळलेली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ठाकरेंच्या ‘सामना’बाबतच्या या वक्तव्यामुळे शिवसैनिकांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी व आपले ज्वलंत विचार राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सामना’ची सुरुवात केली होती. हे वृत्तपत्र पक्षाचे मुखपत्र असल्याचे ते जाहीरपणे मान्यही करत. एवढेच नव्हे तर निवडणुकांसाठीच्या उमेदवारांची यादी असो वा पक्षातील प्रमुख पदाधिकार्यांच्या निवडीही या मुखपत्राद्वारेच जाहीर केल्या जात असत. मात्र आता बाळासाहेबांच्या तिसर्या पिढीचे नेतृत्व करणार्या आदित्य ठाकरेंनीच हे वर्तमानपत्र पक्षाचे मुखपत्र नसल्याचे जाहीर केल्याने शिवसैनिकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एक मे रोजी ‘सामना’च्या अग्रलेखात
गुजराती समाजाच्या ‘बेपारी’ वृत्तीवर टीका करण्यात आली होती. वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक व पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी हा अग्रलेख लिहिला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत युतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार्या गुजराती समाजाला दुखावल्यास विधानसभेला मोठा फटका बसू शकतो, याची जाणीव झाल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने ती पक्षाची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले होते.
सोमवारी आदित्य ठाकरे यांनीही एक संदेश पाठवून ‘सामना’तील भूमिका पक्षाची नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘गेल्या दोन दिवसांपासून मराठी-गुजराती वाद झडतो आहे. शिवसेना आणि गुजराती समाजात दुरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गुजराती समाज नेहमी शिवसेनाप्रमुखांच्या जवळ राहिलेला आहे आणि नेहमीच मराठी आणि गुजराती समाजाने एकमेकांना मदत केलेली आहे. अग्रलेखातील भूमिका ही व्यक्तिगत असल्याने ती पक्षाची वा पक्षाच्या पदाधिकार्यांची नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.