मुंबई - हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पंचवीस वर्षांपूर्वी स्थापन झालेली शिवसेना-भाजप युती मुख्यमंत्रिपद आणि जागावाटपावरून झालेल्या अटीतटीमुळे गुरुवारी तुटली. शिवसेनेचे बोट धरून राज्यात बाळसे धरलेला भाजप आणि मराठी अस्मितेचा गजर करणाऱ्या शिवसेना युतीच्या ताटातुटीमुळे विचारांपेक्षा सत्ता महत्त्वाची यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
जागावाटपावरून सर्वमान्य तोडगा निघाला नसल्यामुळे भाजपने शिवसेनेबरोबरची युती तोडून वेगळ्या मार्गाने जाण्याचा निर्णय जाहीर केला. राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना यांनी भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला असून शिवशक्ती-भीमशक्तीच्या नावाखाली सेनेसोबत गेलेले रामदास आठवले यांनी मात्र अद्याप
आपला निर्णय गुलदस्त्यात ठेवला आहे.
युती तुटली आणि युती अखंड राहणार अशा परस्परविरोधी बातम्यांमुळे निर्माण झालेल्या राजकीय वादावर पडदा टाकत अखेर भाजपनेच पुढाकार घेत युती तुटल्याचे गुरुवारी संध्याकाळी जाहीर केले.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी भाजपच्या मुख्यालयात घेतलेल्या एका संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. जागावाटपाबद्दल शिवसेनेने लवचिकता दाखवली नाही. प्रत्येक वेळी त्यांच्यातर्फे नवे प्रस्ताव दिले जायचे. कधी भाजपच्या तर कधी मित्र पक्षांच्या जागा कमी केल्या जायच्या. आम्ही हे ठरवले आहे, असे सांगूनच शिवसेना चर्चेला सुरूवात करायची, असे सांगत फडणवीस यांनी काडीमोडाची घोषणा केली पण निवडणुकीनंतर पुन्हा शिवसेनेसोबत युती करण्याच्या शक्यतेचे दारही त्यांनी उघडे ठेवले आहे.
का मोडला संसार?
मुख्यमंत्रिपदाची आकांक्षा : एक-दोन जागा कमी-जास्त करणे नव्हे तर मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेना अडून बसल्याने युती तुटली. ज्याचे संख्याबळ जास्त त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मान्य नव्हते.आज राजीव प्रताप रुडी यांनीही शेवटचा प्रयत्न म्हणून शिवसेनेशी चर्चा केली. परंतु ठाकरे यांनी भूमिका बदलली नाही.
जागावाटपाचे धूमशान
भाजपने १३५ जागा मागितल्या होत्या. वाटाघाटीत भाजप १२७ जागांवर राजी झाले होते. मात्र शिवसेना भाजपला १२३ पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नव्हती. शेवटी शिवसेनेने जागावाटपाचा १५१:१३० असा फॉर्म्युला दिला. त्यात घटक पक्षांना ७ जागा दिल्याने त्याला सर्वांनीच नकार दिला.
पुढे वाचा गेल्या 25 वर्षांतील सेना-भाजपची कामगिरी...