आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबै बँकेच्या रिंगणात सेना-भाजप आमनेसामने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्याच्या सत्तेत नाइलाजाने एकत्र आलेले शिवसेना व भाजप हे पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकण्याची जणू संधीच शोधत असतात. मुंबै बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांना आपला जोर आजमावण्याची संधी प्राप्त झाली असून एरवी मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमेकांच्या शेजारी बसणारे मंत्री या बँकेच्या प्रचाराच्या निमित्ताने एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

मुंबई जिल्हा सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँकेवर आतापर्यंत एकहाती वर्चस्व असलेल्या पूर्वाश्रमीचे मनसे आमदार आणि आता भाजपमध्ये सामील झालेले प्रवीण दरेकर यांना शिवसेनेच्या शिवप्रेरणा पॅनलने कडवे आव्हान उभे केले आहे. सध्या मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी असलेल्या दरेकर यांच्यावर मुंबै बँकेच्या कारभारावरून गेल्या काही महिन्यांत भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्याचबरोबर दरेकर यांचे निकटवर्तीय आणि बँकेचे संचालक
असलेल्या शिवाजीराव नलावडेंवरही बोगस पतसंस्था उभारून कोट्यवधींची कर्जे नियमबाह्य पद्धतीने दिल्याचा आरोप झाला होता. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी होणा-या निवडणुकीत बँकेवर गेल्या दहा वर्षांपासून असलेली आपली सत्ता राखण्याचे मोठे आव्हान दरेकर यांच्या समोर असणार आहे. मात्र, नव्यानेच भाजपमध्ये दाखल झालेल्या दरेकर यांच्या पाठीशी भाजपने मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या रूपाने आपली ताकद लावली आहे. सहकार क्षेत्रात तशी भाजपची कामगिरी यथातथाच असली तरी सध्या सत्तेत असल्याने दरेकर यांच्या सहकार पॅनलसाठी भाजपच्या विनोद तावडे आणि प्रकाश मेहता यांच्यासारख्या दिग्गज मंत्र्यांनी प्रचार केला. दरेकर यांच्या भाजपपुरस्कृत सहकार पॅनलला शिवसेना पुरस्कृत शिवप्रेरणा पॅनलचे मोठे आव्हान आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे आमदार असलेले बंधू सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने यंदा मुंबै बँकेवर भगवा फडकवण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी शिवसेनेचे मंत्री रामदास कदम आणि शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी प्रचारात सहभागी होत भाजप पुरस्कृत पॅनलवर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यामुळे मंत्रिमंडळात एकमेकांच्या शेजारी बसणा-या सहकारी मंत्र्यांमध्ये वाक् युद्ध रंगलेले पाहायला मिळाले.दोन्हीकडून एकमेकांवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केला जात आहे.

मतदारांना चांदीच्या नोटा वाटल्या : दरेकर
शिवसेनेचे नगरसेवक आणि शिवप्रेरणा पॅनेलतर्फे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या अभिषेक घोसाळकर यांनी मतदारांना चांदीच्या नोटा वाटल्या, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. याबाबतची तक्रार आपण मुंबई पोलिसांकडे दाखल करणार आहोत असे सांगत दरेकर यांनी हा निवडणूक आचार संहितेचा भंग असल्याचे सांगितले आहे. तसेच याबाबतची आणखी एक तक्रार आपण निवडणूक अधिका-यांकडही करणार असल्याचे ते म्हणाले.

सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही मुंबै बँकेच्या प्रचारात
एकीकडे भाजप पुरस्कृत सहकार पॅनेलच्या विरोधात शिवसेना पुरस्कृत शिवप्रेरणा पॅनेलने मुंबईत ठिकठिकाणी विभागीय मेळावे घेऊन प्रचाराचे नियोजन केले असतानाच आता त्यांच्या मदतीला खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आले आहेत. उद्धव यांनी मुंबै बँकेच्या मतदारांना आपल्या सहीनिशी एक पत्र लिहिले असून, त्यात मुंबै बँकेत वर्षानुवर्षे चरणा-या या भ्रष्टाचारी बैलांना वेसण घाला, असे आवाहन केले आहे.