मुंबई - भाजपबरोबरच्या सत्तावाटपाच्या बोलणीत शिवसेनेने एक पाऊल मागे घेत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदावरील दावा सोडल्यामुळे मंगळवारपर्यंत सत्तावाटपाचा तिढा सुटून गुरुवारी होणा-या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात सध्या विरोधी पक्षात असलेली शिवसेना सत्ताधारी होण्याची शक्यता आहे.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून सरकारची कोंडी केली जाण्याची शक्यता गृहीत धरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तयारी केली आहे. केवळ दहा मंत्र्यांवर हिवाळी अधिवेशन चालवणे शक्य होणार नाही, अशी कबुली देत त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानुसार येत्या गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता भाजपमधील सूत्रांनी वर्तवली. शिवसेनेबरोबर चर्चा यशस्वी झाली तर शिवसेनेचे दहा मंत्री आणि भाजपचे १५ मंत्री शपथ घेतील. मात्र, शिवसेनेशी चर्चा यशस्वी झाली नाही तर फक्त भाजपचेच २० मंत्री शपथ घेतील, असेही सूत्रांनी सांगितले. भाजपबरोबरची सत्तावाटपाची चर्चा यशस्वी झाल्यास सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, सुनील प्रभू यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.
संभाव्य कॅबिनेट मंत्री : मंत्रिमंडळ विस्तारात महादेव जानकर आणि विनायक मेटेंचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात असून गिरीश महाजन, गिरीश बापट, जयकुमार रावळ, मंगलप्रभात लोढा, सुनील देशमुख, गोवर्धन शर्मा, चैनसुख संचेती यांच्यापैकी पाच किंवा सहा जणांना कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकेल.
संभाव्य राज्यमंत्री : राज्यमंत्रिपदी राम शिंदे, जयकुमार रावळ, संभाजी पाटील निलंगेकर, सुभाष देशमुख, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, सीमा हिरे, देवयानी फरांदे, चंद्रशेखर बावनकुळे. कृष्णा खोपडे, बाळा भेगडे, बबन लोणीकर, मदन येरावार, सदाभाऊ खोत (स्वाभिमानी शेतकरी), विनायक मेटे (शिवसंग्राम) आणि भूपेश थुलकर किंवा अविनाश महातेकर (आरपीआय) यांच्या नावाची चर्चा आहे.
संजय कुटे सीएमओ मंत्री?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीनुसार काम करीत असून राज्यात प्रथमच सीएमओ राज्यमंत्रिपद निर्माण करण्यात येणार असल्याचे समजते. तरुण आणि नव्या आमदाराकडे ही जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांचे नाव या पदासाठी आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेला ऊर्जा, पर्यटन : चर्चा यशस्वी झाली तर ऊर्जा, पर्यटन, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम अशी काही महत्त्वाची कॅबिनेट मंत्रिपदे शिवसेनेला मिळतील, असेही सांगितले जात आहे.
बाकीच्यांनी बोलू नये : फडणवीस
भाजपकडून शिवसेनेला मूर्ख बनवण्यात येत असल्याच्या शिवसेना नेते रामदास कदम यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवला. जे अधिकृतपणे चर्चेत सहभागी आहेत, त्यांनीच या कोंडीबाबत बोलावे, बाकीच्यांनी उगाच बोलू नये, असे फडणवीस म्हणाले.
शिवसेनेला हवी तेरा, भाजपने देऊ केली दहा
शिवसेनेने एक पाऊल मागे घेत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपदावरचा
आपला दावा सोडला असला तरी शिवसेना १३ मंत्रिपदावर अडून बसली आहे. भाजपने त्यांना दहा मंत्रिपदे देऊ केली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सोमवारी रात्री उशिरा शिवसेना नेत्यांनी बैठक घेऊन याबाबत चर्चा केली. रविवारी रात्रीही मुख्यमंत्र्यांबरोबर शिवसेना नेत्यांनी चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना १० मंत्रिपदांवर मान्य होईल आणि मंगळवारी सत्तावाटपाचा तिढा सुटेल, असे भाजपच्या वर्तुळातून सांगितले जात आहे.
मराठवाड्याला आणखी 3 मंत्रिपदे? : गुरुवारी होणा-या राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात संभाजी पाटील निलंगेकर, बबन लोणीकर आणि विनायक मेटे या मराठवाड्यातील आमदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.