आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena BJP Get Lead In Mumbai And Thane, Divya Marathi

मुंबई- ठाणेचा ग्राउंड रिपोर्ट : मुंबई, ठाण्यात काँग्रेसचा घाटा; सेना-भाजपला वाटा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील ३६ मतदारसंघांत या वेळेस भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना लाभ होण्याची चिन्हे आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद मात्र घटणार आहे. दलित व मराठेतर भाषकांची मते निर्णायक ठरतील. २००९ मध्ये मनसेमुळे झालेल्या मतविभाजनामुळे काँग्रेसने १७ तर राष्ट्रवादीने ३ जागा जिंकल्या होत्या. यावेळी मात्र काँग्रेसच्या जागा ६ ते १० ने तर राष्ट्रवादीच्याही जागा कमी होण्याची शक्यता आहे.
* मुंबई ३६ जागा
मराठी मतांचा टक्का मनसेऐवजी शिवसेनेकडे झुकण्याची चिन्हे
मुंबईमध्ये मराठी विरुद्ध गुजराती वादाची ठिणगी पेटली असल्याने कालपर्यंत हिंदुत्वाच्या नावाने मिळणारी गुजराती, उत्तर भारतीय मते शिवसेनेपासून दुरावण्याची शक्यता अधिक आहे. मात्र मराठी मतांचा टक्का ठामपणे मनसेऐवजी शिवसेनेची सोबत करू शकतो. सध्या विधान परिषदेत असलेले भाजप नेते विनोद तावडे, आशिष शेलार हे विधानसभेत दिसतील. काँग्रेसचे नेते व चव्हाण मंत्रिमंडळातील मंत्री नसीम खान, सुरेश शेट्टी व आमदार अशोक जाधव, जगन्नाथ शेट्टी, अ‍ॅनी शेखर, अमीन पटेल आणि बलदेव खोसा हे पराभवाच्या छायेत आहेत. मुंबई, ठाण्यात समाजवादी पक्षाचे अस्तित्व संपण्याची शक्यता असून रिपब्लिकन पक्षाचे विविध गटही आपला एकही उमेदवार निवडून आणू शकणार नाहीत. धारावीत वर्षा गायकवाड तर वडाळ्यात कालिदास कोळंबकर हेच पुन्हा निवडून येतील. सायन कोळीवाड्यात मात्र शिवसेनेचे मंगेश सातमकर आणि राष्ट्रवादीचे प्रसाद लाड यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे विद्यमान आमदार जगन्नाथ शेट्टींच्या अडचणी वाढल्या आहेत. तिरंगी लढतीत मतविभागणीचा फायदा घेत शिवसेनेचे सातमकर सरशी साधू शकतात. गेल्या वेळी सरवणकरांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या हातातून गेलेला माहिम मतदारसंघ यंदा मात्र सरवणकरांना उमेदवारीमुळे पु्न्हा शिवसेनेच्या ताब्यात येईल. वरळीत सचिन अहिर यांना पुन्हा विजयाची संधी आहे. शिवडीत आमदार बाळा नांदगावकरांचा मार्ग सुकर झाला आहे. भायखळ्यात या वेळी शिवसेनेच्या पाठिंब्याच्या बळावर अखिल भारतीय सेनेच्या उमेदवार गीता गवळी चमत्कार करू शकतात. मलबार हिलमधून भाजपच्या विद्यमान आमदार मंगलप्रभात लोढांना फारशी ताकद लावावी लागणार नाही. तर मुंबादेवीत भाजपचे माजी आमदार अतुल शहा काँग्रेसच्या अमीन पटेलांना धक्का देत धक्कादायक विजय नोंदवू शकतील. कुलाब्यात काँग्रेसच्या विद्यमान आमदार अ‍ॅनी शेखर यांनी वयोमानानुसार राजकारणातून माघार घेण्याची तयारी चालवली असतानाच काँग्रेसने पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजपच्या राज पुरोहित यांना राज्य सरकारविरोधी लॉटरी लागू शकते. घाटकोपर पूर्वमध्ये भाजपचे विद्यमान आमदार प्रकाश मेहता यांच्याविरोधात काँग्रेसने प्रवीण छेडा या गुजराती नगरसेवकास उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात या वेळी घमासान लढाई आहे. मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये समाजवादीचे अबू आझमी आणि काँग्रेसचे युसूफ अब्राहमी या दोघा उत्तर भारतीय मुस्लिम उमेदवारांत लढत आहे. परिणामी शिवसेनेच्या सुरेश ऊर्फ बुलेट पाटील या नगरसेवकाला या वेळी विधानसभेची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. अणुशक्तिनगर मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांच्याविरोधात शिवसेना, मनसे, भाजपच्या मतदारांचे विभाजन होत असल्याने राष्ट्रवादीचे मलिक नफ्यात आहेत. चेंबूर येथे काँग्रेसचे हंडोरे पुन्हा बाजी मारण्याची चिन्हे आहेत. कुर्ला मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार मिलिंद कांबळे यांच्याविरोधात शिवसेनेच्या मंगेश कुडाळकर यांचा विजय दृष्टिपथात आहे. विक्रोळीत "मनसे'चे मंगेश सांगळे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. मुलुंडला भाजपचे विद्यमान आमदार सरदार तारासिंग बाजी मारण्याची शक्यता आहे. भांडुप पश्चिममध्ये मनसेचे विद्यमान आमदार शिशिर शिंदे पुन्हा रिंगणात असून तेच पुन्हा विजयी होतील. घाटकोपर पश्चिममधील मनसेचे विद्यमान आमदार राम कदम या वेळी भाजपच्या तिकिटावर उभे असून कदम यांचा विजय निश्चित आहे.
शिवसेनेला फुटणार घाम : शिवसेनेला पश्चिम उपनगरातील आपल्या जागा कायम ठेवणे कठीण जाणार असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसने विद्यमान आमदारांनाच तिकीट देऊन सुरक्षित गेम खेळण्याचा प्रयत्न केला आहे, तर भाजप कार्यकर्त्यांना आपली ताकद दाखवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दहिसरमध्ये शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांना मनसेच्या शुभा राऊळांवर विजय मिळाल्यास तो अत्यल्प फरकाने असण्याची शक्यता आहे. बोरिवलीमध्ये भाजपच्या विनोद तावडे यांचा विजय निश्चित आहे. मागाठाणे येथून मनसेचे प्रवीण दरेकर पुन्हा विजयी होण्याची चिन्हे आहेत. कांदिवलीमधून काँग्रेसच्या रमेशसिंह ठाकूर यांच्यासमोर भाजपचे अतुल भातखळकर, शिवसेनेचे अमोल कीर्तिकर या लढतीत निकाल शेवटच्या क्षणापर्यंत कुठेही फ‍िरू शकतो. चारकोपमध्ये भाजपाचे योगेश सागर निवडून येण्याची चिन्हे आहेत. दिंडोशीमध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार राजहंस सिंह ,भाजपचे मोहित कुंभोज ,शिवसेनेचे माजी महापौर सुनील प्रभू , मनसेच्या शालिनी ठाकरे या लढतीत कुंभोज पुढे निघण्याची शक्यता आहे. मालाडमध्ये काँग्रेसच्या अस्लम शेख यांना भाजपचे डॉ. राम बारोट तगडी टक्कर देतील, असे म्हटले जात आहे. गोरेगावमध्ये शिवसेनेच्या सुभाष देसाई यांचा विजय निश्चित मानला जात आहे. जोगेश्वरीमध्ये शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांना भाजपच्या उज्ज्वला मोडक चांगलीच टक्कर देत असून मतदारसंघात प्रचंड चुरस आहे. चांदिवलीमध्ये माजी मंत्री नसीम खान यांना भाजपचे सीताराम तिवारी यांच्याकडून लढत मिळत असून तिवारीच जिंकण्याची चिन्हे आहेत. माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनाही अंधेरी पूर्वमधून शिवसेनेचे रमेश लटके, मनसेचे संदीप दळवी यांच्याशी लढत देणे अवघड जात आहे. अंधेरी पश्चिमेला काँग्रेसचे विद्यमान आमदार अशोक जाधव यांना आपली जागा राखणे कठीण असून शिवसेनेचे जयवंत परब निवडून येऊ शकतात. वर्सोवा येथे भाजपच्या डॉ. भारती लव्हेकर विजयी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यमान आमदार बलदेव खोसा आणि मनसेचे मनीष धुरी यांच्या लढाईत भाजपला लॉटरी लागू शकते. वांद्रे येथे काँग्रेसच्या बाबा सिद्दिकी यांना भाजपचे आशिष शेलार धक्का देऊ शकतात. वांद्रे पूर्व येथे शिवसेनेचे आमदार प्रकाश सावंत यांचा निसटता विजय होण्याची शक्यता आहे.
ठाणे शहर 0६ जागा
ठाण्यात शिवसेनेचा गड राहणार भक्कम!
ठाणे शहर हा शिवसेनेचा गड आहे. आनंद दिघेंनी भक्कम केलेला हा गड नंतरच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बांधण्यात आला. यंदाही ठाणे शहर व परिसरात शिवसेना सर्वाधिक जागा मिळवेल, ठाणे शहर मतदारसंघात काँग्रेसमधून सेनेत आलेल्या रवींद्र फाटकांना भाजपचे संजय केळकर व राष्ट्रवादीच्या निरंजन डावखरेंकडून लढत असली तरी शेवटी शिवसेनेची सरशी होईल, असे वाटते. शेजारच्या ओवळा माजिवड्यातही अशीच लक्षणे आहेत. गेल्या वेळेप्रमाणेच शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांना पुन्हा पसंती मिळू शकते. कोपरी पाचपाखाडीत प्रारंभी शिवसेनेच्याच अनंत तरे यांनी उमेदवारी दाखल केल्याने शिवसेनेच्या नेतृत्वाची धावपळ उडाली. परंतु थेट "मातोश्री'वरून आश्वासन मिळाल्यानंतर तरेंनी माघार घेतली. त्यात तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अभावी शिवसेनेचे विद्यमान आमदार एकनाथ शिंदेंचा विजय निश्चित मानला जात आहे. मुंब्रा कळवा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड विरुद्ध एमआयएमचे अश्रफ मुलाणी यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. मात्र कळवा खारीगाव या मराठी पट्ट्यातून भूमिपुत्र हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असलेल्या शिवसेनेच्या दशरथ पाटील यांनी मते खेचल्यास आव्हाडांची अडचण होऊ शकते. ऐरोली मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे संदीप नाईक विरुद्ध शिवसेनेचे विजय चौगुले हे एकमेकांचे कट्टर वैरी आमनेसामने आहेत. त्यातच शिवसेनेचे बंडखोर वैभव नाईकही रिंगणात आहेत. या दुहीचा फायदा संदीप नाईक यांना होण्याची शक्यता आहे. बेलापूर मतदारसंघात मात्र राष्ट्रवादीच्या गणेश नाईकांसमोर शिवसेनेच्या विजय नहाटांनी आव्हान उभे केले असल्याने नाईकांचा विजय थोडासा अवघड बनला आहे.
पालघर ०६ जागा
हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व
वसई मतदारसंघातून या वेळी हितेंद्र ठाकूर स्वत: रिंगणात असल्याने शिवसेना पुरस्कृत आमदार विवेक पंडित डेंजर झोनमध्ये आहेत. हितेंद्र ठाकूर यांचा मुलगा क्षितिज ठाकूर हेही दुस-यांदा नालासोपारामधून नशीब आजमावत असून ते विजयी होऊ शकतात. बोईसरला आघाडीचे विलास तरे यांचा सामना शिवसेनेच्या कमळाकर दळवी यांच्याशी आहे. विक्रमगडमध्ये राष्ट्रवादीचे सुनील भुसारा विरुद्ध भाजपचे विष्णू सावरा अशा लढतीत भाजप विजयी होईल.पालघरमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावीत, शिवसेनेचे कृष्णा घोडा आणि बविआच्या मनीषा निमकर यांच्यातील तिरंगी लढतीत कुणीही विजयी होऊ शकते. डहाणूत राष्ट्रवादीचे काशीनाथ चौधरी, काँग्रेसचे रमेश पडवळे, शिवसेनेचे शंकर नम, भाजपचे पास्कल धनागरे आणि माकपचे बारक्या मांगत अशी येथे बहुरंगी लढत आहे. मात्र या वेळी बंडखोरीमुळे माकप उमेदवार अडचणीत आले आहेत.
ठाणे ग्रामीण १२जागा
समाजवादी पार्टीचा अस्तित्वासाठी संघर्ष
भिवंडी पूर्वमध्ये शिवसेनेचे रूपेश म्हात्रे आणि समाजवादीचे फरहान आझमी यांच्यात कडवी लढत आहे. पोटनिवडणुकीत ताब्यात आलेला गड राखण्याचे सेनेसमोर आव्हान आहे. भिवंडी पश्चिममध्ये सपाचे विद्यमान आमदार रशीद ताहीर मोमीन या वेळी राष्ट्रवादीचे उमेदवार असून शिवसेनेचे मनोज काटेकर आणि भाजपचे महेश चौघुले यांच्यातील झुंज चुरसपूर्ण आहे. उल्हासनगरमध्ये भाजपचे कुमार आयलानी यांना मोदींच्या प्रतिमेचा फायदा मिळू शकतो. अंबरनाथ राखीवमधून शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर यांना पुन्हा संधी मिळू शकते. मुरबाड मतदारसंघात भाजपचे किसन कथोरे व राष्ट्रवादीचे गोटीराम पवार आणि शिवसेनेचे वामन म्हात्रे यांच्यात चुरशीची लढत आहे. मीरा भाईंदरमध्ये राष्ट्रवादीचे गिल्बर्ट मेंडोन्सा भाजपचे नरेंद्र मेहता आणि काँग्रेसचे याकूब यांच्यात कुणीही जिंकू शकते. कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेचे रमेश पाटील यांची शिवसेनेचे सुभाष भोईर यांच्याशी लढत असून मनसेवरील नाराजीचा लाभ शिवसेनेला होईल. कल्याण पूर्व मतदारसंघात अपक्ष आमदार गणपत गायकवाडांसमोर शिवसेनेचे गोपाळ लांडगे आणि राष्ट्रवादीचे नीलेश शिंदे अशी तिरंगी लढत होईल. कल्याण पश्चिममध्ये मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांना शिवसेनेचे विजय साळवी, काँग्रेसचे सचिन पोटे यांचे कडवे आव्हान असेल. डोंबिवली मतदारसंघात भाजपचे रवींद्र चव्हाण यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघातील पंचरंगी लढतीत कुणीही जिंकू शकते.