आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena BJP News In Marathi, Devendra Fadanvis, Mahayuti, RPI

भाजपचे सर्व पर्याय शिवसेनेला अमान्य, जागावाटप रखडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेना- भाजपमध्ये जागावाटपावरून धुसफुस वाढत चालली आहे. 15 ऑगस्टला जागा वाटपाची बोलणी पूर्ण होईल, असा दावा महायुतीकडून करण्यात येत असताना अजूनही बोलणी पुढे जाण्याचे नाव घेत नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेसाठी सतत संपर्क करूनही शिवसेनेकडून प्रतिसाद दिला जात नसल्याचे दिसत आहे. नव्या मित्रपक्षांना शिवसेनेच्या कोट्यामधून जागा द्याव्यात, अशी भाजपने गुगली टाकल्याने शिवसेनेच्या नाराजीत आणखी भर पडली आहे.

महायुतीतील रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी पक्ष, शिवसंग्राम, राष्‍ट्रीय समाज पक्ष या नव्या मित्रपक्षांना मिळून 10 जागा द्याव्यात आणि ती जबाबदारी शिवसेनेची आहे, असे मत भाजपने नोंदवले आहे. तसेच भाजप निवडून येऊ न शकलेल्या 35 जागा शिवसेनेने घ्याव्यात आणि त्या बदल्यात शिवसेनेकडे असलेल्या 19 जागा आम्हाला सोडाव्यात, या भाजपच्या मागण्या आहेत. मात्र या अटी मान्य नसल्याने शिवसेना चर्चेला तयार होत नाही. राष्‍ट्रीय समाज पक्षाला एकापेक्षा जास्त जागा देऊ नये. राजू शेट्टींच्या स्वाभिमान संघटनेची पश्चिम महाराष्‍ट्रात ताकद असल्याने त्यांना 5 जागा द्याव्यात. तर रिपाइंला 4, तर विनायक मेटेंच्या शिवसंग्रामला 1 जागा द्यावी, असे भाजपचे म्हणणे आहे.

भाजपची केंद्रीय नेत्यांकडे तक्रार व्यर्थ
जागावाटपाच्या चर्चेसाठी शिवसेनेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे याविषयी तक्रार नोंदवली होती. मात्र महायुतीतील जागा वाटपाची चर्चा ही राज्य पातळीवर आणि राज्यातील नेत्यांच्यामार्फत होईल, असे स्पष्ट करण्यात आल्याने फडणीवीसांची आणखी अडचण झाली आहे.