आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena BJP News In Marathi, Divya Marathi, Maharashtra Assembly Election 2014

\'हवेवर स्वार होऊन तलवारबाजी करू नका, पाय जमिनीवरच ठेवा\' - शिवसेना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागावाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना- भाजप युतीतील तणाव बुधवारी आणखी वाढला. पंचवीस वर्षांपासूनचा मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या वाढीव जागांची मागणी धुडकावून लावत शिवसेनेने कठोर भूमिका घेतली. हवेवर स्वार होऊन तलवारबाजी करू नका, पाय जमिनीवरच ठेवा. असा सल्ला देतानाच शिवसेनाच जास्त जागा लढवणार आणि मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच असेल, असे शिवसेनेने भाजपला ठणकावले.

विधानसभेच्या २८८ पैकी १३५ जागा देण्याची मागणी भाजपने केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपची ही मागणी आधीच धुडकावून लावली आहे. त्यामुळे युतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भाजपची साथ सोडून शिवसेनेने आगामी विधानसभा स्वबळावर लढवावी, अशी मागणी शिवसैनिकांकडून लावून धरली जात असतानाच भाजपमधूनही स्वबळाची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांत तणाव वाढत चालला आहे.
पुढच्या महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनाच जास्त जागा (भाजपपेक्षा) लढवणार. मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच राहील. याबाबत चर्चा सुरू आहे. त्यातून गुरुवारपर्यंत अंतिम तोडगा निघेल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
२००९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने १६९ तर भाजपने ११९ जागा लढवल्या होत्या. जागा वाटपाचा हाच फॉर्म्युला कायम ठेवण्याचा शिवसेनेचा आग्रह आहे. तर लोकसभा निवडणुकीत राज्यात युतीला मिळालेले यश हे मोदी लाटेचा परिपाक असल्याचे सांगत भाजपने १३५ जागांची मागणी केली आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीत तणाव निर्माण झाला आहे.

लव्ह जिहाद नाकारला
लोकांना सध्या केवळ विकासात रस आहे. ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा राजकीय प्रचाराचे साधन होऊ शकत नाही. भाजपचा हा मुद्दा लोकांनी नाकारला आहे. ‘लव्ह जिहाद’ हा मुद्दा असला तरी तो प्रचाराचा मुद्दा होऊ शकत नाही,असे राऊत म्हणाले.

जमिनीवर पाय ठेवा
नऊ राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला सपाटून पराभव पत्करावा लागल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. या निकालातून भाजपने धडा घ्यावा. लोकसभा निवडणुकीतील विजयाने हुरळून जाऊ नका, आपले पाय जमिनीवर ठेवावेत, असा खोचक सल्ला शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपला देण्यात आला आहे.

उन्माद नको
महाराष्ट्रात मोदी लाट असल्याचा दावा फेटाळून लावत राऊत म्हणाले, की, मोदी भारताचे लोकप्रिय नेते आहेत. परंतु महाराष्ट्रात मोदी लाट नाही. येथे फक्त शिवसेनेची लाट आहे. बाळासाहेब ठाकरेंची लाट आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळालेले यश हा मोदी लाटेचा परिपाक असल्याचे सांगत भाजपने विधानसभेसाठी १३५ जागांची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी भाजपला हवेत जाऊ नका असा सल्ला िदला.

तोडगा िनघण्याची आशा, पण स्वबळाचीही तयारी : मुख्यमंत्री

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील जागावाटपाबाबत येत्या दोन-तीन दिवसांत तोडगा निघेल,परंतु तोडगा निघालाच नाही तर काँग्रेसने २८८ जागांवर स्वबळावर लढण्याची तयारीही केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. ते हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत आले होते. मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही स्वबळाची तयारी केली आहे. पण उमेदवार यादी तयार नाही. आपले वास्तव्य दक्षिण कराड मतदारसंघात असल्याने तेथून निवडणूक लढवणार असल्याचे ते म्हणाले.