आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shiv Sena BJP News In Marathi, Maharashtra Assembly Election 2014, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेढ मिटली, तिढा कायम; 25 वर्षांची मैत्री पुढेही कायम ठेवण्याचे मिळाले संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागावाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपने घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे पंचवीस वर्षांपासूनची युती टिकणार की नाही, याबद्दल अनेक तर्कवितर्कांना उधाण आलेले असतानाच दोन्ही मित्रपक्षांनी सामंजस्य दाखवत एक पाऊल पुढे टाकले आणि युती अभेद्यच राहण्याचे संकेत शुक्रवारी दिले. मात्र जागावाटपावर कोणताही तोडगा न निघाल्याने युतीतील तणाव मात्र कायम आहे. दोघेही एकमेकांकडे प्रस्ताव दिल्याचे सांगत आहेत. मात्र दोन्ही पक्षांचे प्रस्ताव कोणते हे गुलदस्त्यातच आहे.

आम्ही आमचा प्रस्ताव दिला आहे, त्यावर निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे, असे शिवसेना आणि भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे. दोन्ही पक्ष आपापल्या प्रस्तावावर ठाम असल्याने जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. आता याबाबत उद्या शनिवारी सायंकाळपर्यंत ठोस तोडगा निघणे अपेक्षित आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एक पाऊल पुढे टाकण्याची भूमिका घेतल्यानंतर आणि शुक्रवारी सकाळी युती तुटल्याच्या चर्चेचे पेव फुटल्यानंतर भाजपने कोअर समितीची बैठक घेत युती अभंग राहील, असा निर्णय घेतला. शिवसेना-भाजपने 25 वर्षांपासून सतत हरलेल्या जागांची तरी अदलाबदली करा, असा नवा प्रस्ताव देत जागावाटपाच्या सूत्रावर फेरविचाराची तयारी भाजपने दाखवली.

त्यानंतर 119 च्या वर जागा भाजपला देणार नाही अन्यथा महायुती तोडू असे इशारे देणा-या शिवसेनेनेही नंतर भाजपशी हा वाद सामोपचाराने सोडवण्याची भूमिका घेतली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्याशी बैठकांचा धडाका लावला. कोकणातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याबरोबरच त्यांनी नेत्यांबरोबर भाजपाबरोबच्या जागा वाटपाची चर्चा केली. या चर्चेत भाजपाला चार-पाच जागा वाढवून द्याव्यात असा सूर निघाल्याचे बैठकीला उपस्थित सूत्रांनी सांगितले.

गुरूवारी रात्री शिवसेनेने भाजपला मित्रपक्षांसह 119 जागा देण्याचा प्रस्ताव दिला आणि भाजपने थेट हा प्रस्ताव धुडकावत महायुतीबाबत विचार करू असा निरोप सेनेला दिला.या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी भाजपच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक एकनाथ खडसेंच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. या बैठकीत सर्वानुमते भाजप आणि शिवसेनेची 25 वर्षांपासूनची युती टिकवावी असा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीत घेतलेल्या निर्णयाबाबत बोलताना भाजप नेते एकनाथ खडसेंनी मात्र आक्रमक भूमिका घेतली. नेहमी भाजपनेच का त्याग करावा अशी आमच्या कार्यकर्त्यांची भावना असून किमान सन्मानाने जागावाटप व्हावे अशीच भाजपची भूमिका असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. युती अस्तित्वात आल्यापासून आपल्या वाट्याच्या ज्या सहा लोकसभेच्या जागा भाजपने वेळोवेळी शिवसेनेला दिल्या त्या बदल्यात विधानसभेच्या काही जागा शिवसेनेने द्याव्यात अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. युतीच्या स्थापनेपासून ज्या जागा शिवसेनेने कधीही जिंकल्या नाहीत. आणि ज्या जागा आम्ही कधीही जिंकल्या नाहीत किमान त्या जागांची तरी अदलाबदल करण्याचा एक नवा प्रस्ताव घेऊन आम्ही सेनेशी पुन्हा चर्चा करणार आहोत, असे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मनगुंटीवार यांनी सांगितले.

जाणीवपूर्वक घातला घोळ- राजकीय नेते हे साधारणत: पितृपक्षात आपला उमेदवारी अर्ज दाखल करायला इच्छुक नसतात. 24 सप्टेंबर रोजी पितृपक्ष संपणार असून त्यानंतरच उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजप असो की काँग्रेस-राष्ट्रवादी, हे तिकिटेच्छूंना रोखून धरण्यासाठी जाणूनबुजून चर्चेचा घोळ घालत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

घटक पक्षांचाच गेम?- महायुती तुटणार, अशा बातम्या येताच घटक पक्ष अस्वस्थ झाले आणि नरमले. आमच्या जागा कमी करा पण महायुती तोडू नका अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे भाजप-शिवसेना युती तुटण्याचे वातावरण निर्माण करीत आहेत. घटक पक्षांनी जादा मागू नये आणि काँग्रेसकडे पळून जाऊ नये म्हणून डावपेच खेळताहेत, अशी चर्चाही आहे.

-शिवसेना हा महाराष्ट्रात मोठा पक्ष आहे. तो जागा देत असतो, मागत नाही. भाजपचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून शिवसेना महाराष्ट्रात आहे. युती तुटो अथवा राहो, महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल. - संजय राऊत, शिवसेना प्रवक्ते

अनेकदा शिवसेनेने एककल्ली भूमिका घेऊन सुद्धा भाजपने नेहमीच सामंजस्याची भूमिका घेतली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने प्रतिभा पाटील यांना एकतर्फी पाठिंबा दिला तेव्हाही आम्ही संयम बाळगला. नेहमी आम्हीच सामंजस्य का दाखवायचे?- सुधीर मनगुंटीवार, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष

रात्रीची बैठक रद्द- युती कायम राहण्याची घोषणा केल्यानंतर जागावाटपासाठी शुक्रवारी रात्री बोलावण्यात आलेली बैठक होऊ शकली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजपचे निरीक्षक ओम माथूर यांच्यात महापौर भवनात ही बैठक होणार होती, मात्र काही कारणास्तव माथूर येऊ न शकल्याने ही बैठक आता शनिवारी होणार आहे.

अशा घडल्या घडामोडी- सकाळी 9.45 वृत्तवाहिन्यांवर युती तुटल्याची बातमी झळकू लागली आणि राजकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली. शिवसेना पक्षप्रमुखांच्या घरी बैठकांची सत्रे सुरू.
- दुपारी 1.45 भाजपच्या कोअर कमिटीची बैठक विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंच्या घरी सुरू.
- दुपारी 3.45 भाजप बैठक आटोपली.
- दुपारी 4 वा. खडसे आणि मुनगंटीवार यांची पत्रकार परिषद. युती टिकावी ही इच्छा व्यक्त करून अवघ्या 10 मिनिटांत पत्रकार परिषद आटोपली.
- सायं. 5 वा. आदित्य ठाकरे आणि भाजपचे महाराष्ट्र प्रभारी ओम माथूर यांची बैठक.
सायं. 6 पर्यंत युती अभंग राहील असा भाजपसह शिवसेनेच्या नेत्यांचा शब्द.
* दोघेही आपापल्या भूमिकांवर ठाम

आदित्य ठाकरे पहिल्यांदाच मैदानात
जागावाटपाच्या चर्चेपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत:ला अलिप्त ठेवले. मिशन 150 तयार करणारे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना चर्चेसाठी पाठवून उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर पहिलीच मोठी जबाबदारी टाकली. ती त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्याचे सांगितले जात आहे.

निर्णय त्यांनीच घ्यावा
‘दुपारी भाजपने आम्हाला जागावाटपाचा एक फॉर्म्युला दिला होता. आता सायंकाळी आम्ही आम्ही आमचा एक फॉर्म्युला भाजपकडे पाठवला असून त्याबाबत त्यांना निर्णय घ्यायचा आहे.
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

प्रतिसादाची प्रतीक्षा
जागावाटपाबाबत आमच्या पक्षाने शिवसेनेकडे प्रस्ताव दिलेला आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. युती तुटावी असे कोणालाही वाटत नाही.
देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष

युतीविना शिवसेना-भाजप 50 जागांतच गारद
इंडिया न्यूज-द संडे गार्जियन-सी-व्होटरच्या सर्वेक्षणात युती तुटल्यास पुन्हा आघाडी सत्तेवर येईल, असे म्हटले आहे.

युती तुटल्यास...
175 काँग्रेस-राष्ट्रवादी
47 भाजप
36 शिवसेना
30 इतर
अभेद्य राहिल्यास...
198 शिवसेना-भाजप
64 काँग्रेस-राष्ट्रवादी
26 इतर
(सर्व्हे : सप्टेंबरचा दुसरा आठवडा)