आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shiv Sena BJP News In Marathi, Maharashtra Assembly Election 2014, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता लालकृष्ण शिष्टाई; उद्धव यांची वाघनखांची भाषा, तरी भाजपचा तोरा कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधानसभेची निवडणूक २२ दिवसांवर येऊन ठेपली असतानाच शिवसेना-भाजपतील तणाव रविवारी युती तुटण्याच्या शक्यतेपर्यंत ताणला गेला. युती टिकावी असा दोघांकडूनही जप सुरू असला तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोगलांशी लढा देणा-या शिवरायांच्या वाघनखांची आठवण करून दिली, तर भाजपनेही त्यावर कुठलीही प्रतिक्रिया न देता १३० उमेदवारांची यादी श्रेष्ठींकडे सोपवली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांनी दिलेला ११९ जागांचा प्रस्ताव भाजपने धुडकावून लावल्याचेच स्पष्ट होते.
दरम्यान, मध्यरात्रीनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा या प्रकरणात प्रवेश झाला. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून केलेल्या चर्चेनंतर अडवाणींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना सकारात्मक चर्चा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.संसदीय मंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील युती कायम ठेवण्याचे निर्देश दिले.

जागावाटपावरून तिढा सुरू असतानाच उद्धव ठाकरे रविवारी कमालीचे आक्रमक झाले. भाजपपुढे ११९ जागांचा आपला अखेरचा प्रस्ताव असून, यानंतर युती राहो अगर तुटो आम्ही निवडणूक लढण्यास तयार आहोत, असा इशाराच उद्धव यांनी रंगशारदामधील पदाधिकारी मेळाव्यात दिला. दरम्यान, भाजप नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांनी शिवसेनेचा नवा प्रस्ताव मान्य नसल्याचे स्पष्ट केले. माध्यमांतून चर्चा करण्याऐवजी प्रत्यक्ष भेटून चर्चा करू, असे ते म्हणाले. आजवर कधीही न जिंकलेल्या जागांच्या अदलाबदलीचा हेका भाजपने कायम ठेवला.

उद्धव ठाकरेंचा आक्रमकपणा
* मोदी हटावचा नारा सुरू असताना शिवसेनाप्रमुखांनी पाठिंबा दिला.
* मुंडे, महाजनांच्या काळात वाद झाले, पण कोणी ताणले नाहीत.
* युती सत्तेसाठी नव्हे, महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्यासाठी होती.
* देशात तुम्ही हवं तर राज्य करा, राज्यात आम्हाला त्रास देऊ नका.
* उणीदुणी काढू नका, कस्पटासमान लेखणार असाल तर वाघ सज्ज.
* भाजपचा फॉर्म्युला मान्य नाही. त्यांच्याप्रमाणे माझाही पक्ष वाढला.
* आम्ही घेणारे नाहीत, देणारे आहोत. जागा आमच्याकडे आहेत.

* शिवसेनेचा प्रस्ताव
शिवसेना १५१ भाजप ११९ मित्रपक्ष १८

* भाजपची मागणी
शिवसेना १४० भाजप १३० मित्रपक्ष १८

शिवसेनेचे युक्तिवाद
>युवा सेनेचे मिशन १५० कायम राहावे, मित्रपक्षांना स्थान मिळावे म्हणून १६९ जागांची इच्छा असून १८ जागा सोडल्या.
>भाजपची एकही जागा यात कमी होत नाही. आमच्या मिशन १५० ला योग्य ठरेल असाच आकडा शिवसेनेने पुढे केला आहे.
>शिवसेनेने मोठ्या भावाची भूमिका योग्यरीत्या बजावली. तरीही भाजप अडून राहिल्यास स्वबळाशिवाय पर्याय नाही.

भाजपचे युक्तिवाद
>मोदी लाटेच्या बळावरच शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत यश मिळाले आहे. काही दिवसांपासून भाजपचा हा दावा आहे.
>गेल्या विधानसभेत भाजपने ११९ जागा लढवत ४६ जागांवर विजय मिळवला तर सेनेला १६९ जागांपैकी ४५ जागा मिळाल्या.
>गेल्या २००९चे हे चित्र पाहता आमची जिंकण्याची टक्केवारी ही साठ टक्के आहे तर सेनेची ४० टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

त्या ५९ जागा कोणत्या?
शिवसेनेने कधीच न जिंकलेल्या ५९ जागांपैकी ३४ जागा भाजपला हव्या आहेत. यातील ११ प. महाराष्ट्र, ४ मराठवाडा व ६ जागा खान्देशातील आहेत. आपल्या १९ जागा सोडण्याची भाजपची तयारी आहे. तस झाल्यास शिवसेनेकडे ४४ जागा उरतील. काही जागी अनुकूल वातावरणाचा भाजपचा दावा आहे. भाजपला अपेक्षित जागांवर अनेक जागांवर भाजपमध्ये प्रवेश करू इच्छिणारे सक्षम उमेदवार आहेत. तर खान्देशातल्या शिवसेनेने कधीही न जिंकलेल्या कळवण, दिंडोरी, इगतपुरी,नंदूरबार, शहादा आणि पाचोरा सारख्या मतदारसंघात अनुकूल वातावरण असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. मराठवाड्यातही शिवसेनेकडे असलेल्या जागांवर इतर पक्षातील अनेक भाजपमध्ये आले आहेत. त्यांना तिकीट मिळवून देण्यासाठी भाजपचा जागांच्या अदलाबदलीचा अट्टहास आहे.

कोटा का वाढवायचा?
उद्धव यांच्या नव्या पर्यायानुसार मित्रपक्षाला मिळणा-या सर्व जागा शिवसेनेच्या कोट्यातून आहेत. उद्या काही मित्रांनी साथ सोडली तर या जागांवर शिवसेना पुन्हा हक्क सांगेल. त्यामुळे शिवसेनेवर अधिकाधिक दबाव टाकत ११९पेक्षा किमान ४ ते ५ जागा वाढवून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.