आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shiv Sena BJP News In Marathi, Maharashtra Assembly Election 2014, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महायुतीवर मंगळ वक्रीच; भाजप २८८ जागांवर लढणार, शिवसेनेचीही स्वबळाची चाचपणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/नवी दिल्ली - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला अंतिम प्रस्ताव भाजपने धुडकावून लावल्यामुळे २५ वर्षांपासूनच्या युतीवर मंगळ वक्री झाल्याचेच चित्र असून सोमवारीही कोणताच समेट घडून आला नाही. युती शाबूत राहणार नाही असे गृहीत धरून भाजपने २८८ जागांवर लढण्याची तयारीही चालवली आहे. भाजपचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी सोमवारी तसे स्पष्ट संकेतच दिले.

जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने सोमवारी दिवसभर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. युती कायम राहावी अशीच आमची इच्छा आहे. परंतु शिवसेनेने ती तोडण्यास भाग पाडले तर भाजप राज्यातील सर्व २८८ जागा लढवणार आहे, असे रुडी यांनी स्पष्ट केले.

भाजपचे निवडणूक प्रभारी ओम माथूर सोमवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे वृत्त होते. त्यामुळे मातोश्रीबाहेर माध्यमांनी गर्दी केली, परंतु संध्याकाळपर्यंत माथूर मातोश्रीकडे फिरकलेच नाहीत.

घटक पक्ष स्वबळावर लढणार
दुसरीकडे घटक पक्षातील नेत्यांनीही युती तुटू नये अशी अपेक्षा व्यक्त करतानाच युती तुटली तर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

जागांच्या वाटाघाटी । युतीचे त्रांगडे कायम, आघाडीतही बेबनाव
भाजपने २५८ उमेदवारांची यादी तयार केली आहे. आता ३० जागांवरचे उमेदवार ठरणे बाकी आहे. २४तारखेपर्यंत तोडग्याची वाट पाहून २५ तारखेला भाजप उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता पक्षातील सूत्रांनी व्यक्त केली आहे.

युतीची शक्यता कमीच
भाजपा नेते एकनाथ खडसे यांनीही युती होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगत भाजप आक्रमक असल्याचेच दाखवून दिले.

बंडखोरीची धास्ती
शिवसेना-भाजपचे उमेदवार ठरले आहेत. शपथपत्रांसह कागदपत्रे तयार करण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. गुरुवारनंतर अर्ज दाखल केले जातील. बंडखोरी टाळण्यासाठी वेळकाढूपणा सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे.

...तर अशी बदलतील समीकरणे
1.शिवसेनेचा मराठीबाणा
"मराठी माणूस' हा शिवसेनेचा मूळचाच मुद्दा. भाजपशी युतीमुळे ही भूमिका काहिशी मवाळ झाली होती. मनसेने हा मुद्दा चालवला. युती तुटल्यास शिवसेना पुन्हा हा अस्मितेचा मुद्दा हाती घेऊ शकते.
2.भाजपचा स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा राहिला. शिवसेनेच्या विरोधामुळे उघडपणे प्रचाराचा मुद्दा करता आला नाही. किमान समान कार्यक्रमातही तो घेता आला नाही. पण आता भाजपला हा निवडणूक मुद्दा करता येईल.
3 स्थानिक पातळीवर उलथापालथ
स्थानिक पातळीवर दोन्ही पक्ष युती म्हणून सत्तेत आहेत. आता ही समीकरणेही बदलतील. केंद्रात शिवसेना एनडीएतून बाहेर पडेल. अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांचे पद जाईल.
4. राष्ट्रवादीचा फायदा
काँग्रेस आघाडीतही तिढा कायम आहे. निवडणुकीनंतर भाजपला सत्तेची संख्या गाठता न आल्यास राष्ट्रवादीचे चांगभले होईल. यापूर्वी १९८५ मध्ये भाजपने शरद पवारांच्या काँग्रेसची (एस)मदत घेतली होती.
5. मनसेच्या पथ्यावर
भाजप-मनसे जवळीक होऊ शकते. निवडणुकीनंतर युतीही शक्य. मनसेच्या उमेदवाराविरुद्ध भाजपचा उमेदवार नसेल. मनसेला जास्त जागा मिळतील. राज यांचे मोदीप्रेम लोकसभेच्या वेळी दिसलेच.

आघाडीतील जागावाटपावर आज बैठक
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील जागावाटपाचे त्रांगडे सुटण्याच्या दृष्टीने दोन्ही पक्षांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीला १२४ पेक्षाही अधिक जागा देण्याची आपली तयारी असल्याचे संकेत काँग्रेसने दिले आहेत.नवी दिल्लीत काँग्रेस पक्षाच्या मॅरेथॉन बैठका पार पडल्यानंतर आता काँग्रेस या नव्या सूत्रानुसार मंगळवारी राष्ट्रवादीशी चर्चा करणार आहे. आम्ही आणखी ८ ते ९ जागा वाढवून द्यायला तयार आहोत,’ असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी बैठकांनंतर पत्रकारांशी बोलताना केले.

काँग्रेसने दिलेला १२४ जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादीने फेटाळल्यानंतर त्यांचे हे वक्तव्य काँग्रेस १३० ते १३४ जागांपर्यंत तडजोड करू शकते, असे संकेत देणारे होते. या नव्या प्रस्तावासह काँग्रेसचे नेते मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादीला भेटणार आहेत. काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उद्योग मंत्री नारायण राणे आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे चर्चेत सामील होणार आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांची एक बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाबद्दल सखोल चर्चा झाली. त्यानंतर उमेदवार निवडीसाठी छाननी समितीची बैठक झाली. पुन्हा एकदा दुपारी साडे तीनच्या सुमारास सर्व नेत्यांनी सोनिया गांधी यांच्यासह बैठक केली.

जागानिहाय चर्चा हवी
काँग्रेसने आजवर जागांची संख्येपेक्षा प्रत्येक जागेवर चर्चा करून जागावाटप करावे,अशी भूमिका राष्ट्रवादीसमोर मांडली होती. मात्र राष्ट्रवादीने आधी संख्या ठरवा मग जागानिहाय चर्चा असा पवित्रा घेतला आहे. दोन्ही पक्ष आपल्या काही जागांची अदलाबदल करण्यास तयार आहेत.

१७४ जागांचे उमेदवार निश्चीत
आजच्या बैठकांमध्ये आम्ही १७४ जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित केली. यापैकी २० टक्के जागा वगळता ;उर्वरित सर्व जागांसाठी एकच उमेदवाराचे नाव निश्चित करण्यात आले. मात्र उर्वरित जागांसाठी एकपेक्षा अधिक उमेदवारांचे पॅनेल सध्या निश्चित केले आहे.