आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shiv Sena BJP News In Marathi, Maharashtra Assembly Election 2014, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महायुतीचे ठरले, जागांचे अडले; भाजपच्या कार्यालयात जाऊन शिवसेनेने केली चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विधानसभा निवडणुकांना शिवसेना-भाजप आणि घटक पक्ष महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहेत. तथापि, घटक पक्षांना किती जागा द्यायच्या या मुद्द्यावर मात्र अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री दिली.
जागावाटपावरून युतीमध्ये सुरू असलेली तेढ शिवसेनेने चर्चेसाठी पुढाकार घेतल्याने मंगळवारी दुपारीच मिटली.मात्र अंतिम फॉर्म्युल्यानुसार कमी जागा पदरी पडत असल्याने नाराज असलेल्या घटक पक्षांसोबत रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. त्यात कोणताही निर्णय झाला नाही. जागांच्या मुद्द्यावर बुधवारी पुन्हा चर्चा होणार असून, त्यात महायुतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला अंतिम प्रस्ताव भाजपने फेटाळला होता. त्यानंतर मंगळवारी सकाळी शिवसेनेचे नेते मुंबई भाजपच्या कार्यालयात गेले. त्यांनी भाजपसमोर जागावाटपाचा नवा फॉर्म्युला ठेवला. त्यावर घटक पक्षांसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे ठरले. दुपारी पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांचे नेते ब-याच दिवसांनी सुरात सूर मिसळताना पाहायला मिळाले. युती टिकणारच अशी ग्वाही दोन्ही बाजूंनी देण्यात आली, परंतु महायुतीचे काय होणार हे सायंकाळी घटकपक्षांसोबत होणा-या बैठकीनंतर ठरणार असल्याचे स्पष्ट झाले. मुंबई भाजपच्या कार्यालयात दुपारी झालेल्या या बैठकीला शिवसेना नेते संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल देसाई तर भाजपच्या वतीने प्रभारी ओम माथूर, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि संघटनमंत्री रवी भुसारी आदी नेते उपस्थित होते.

दुपारच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे रात्री घटक पक्षांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, रिपाइंचे रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे हजर होते. महायुतीत घटक पक्षांना सन्मानाने स्थान द्या, असा आग्रह या सर्वच घटक पक्षांनी धरला मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून या छोट्या घटक पक्षांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला. भाजपनेही त्यांच्या सुरात सूर मिसळत घटक पक्ष नसतील तर आम्हीही महायुतीतून बाहेर पडू, असा इशारा दिल्याने बैठकीतील तणाव वाढला. त्यामुळे ही बैठक अनिर्णित राहिली. घटक पक्षांना हाताशी धरून भाजप शिवसेनेची कोंडी करत असल्याचे चित्रही यावेळी पहायला मिळाले. कोणाला किती आणि कोणत्या जागा द्यायच्या याबाबतचा निर्णय बुधवारी सकाळी होणा-या बैठकीत अपेक्षित असल्याचे शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी सांगितले.

तत्पूर्वी सकाळच्या बैठकीत शिवसेनेने भाजपकडे जागावाटपाचे दोन प्रस्ताव दिले. त्यापैकी पहिला प्रस्ताव शिवसेनेला १५१, भाजपला १३० आणि घटक पक्षांना ७ जागांचा तर दुसरा प्रस्ताव शिवसेना १५०, भाजप १२६ आणि घटक पक्षांना १२ जागा देण्याचा आहे. मात्र घटकपक्ष एवढ्या कमी जागांवर समाधानी होतील किंवा नाही याबाबत भाजप साशंक असल्याने मित्रपक्षांबरोबर अंतिम चर्चा करून मगच महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय जाहीर करू असे या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले. संजय राऊत यांनी आता घटक पक्षांशी चर्चेची केवळ औपचारिकता शिल्लक असल्याचे सांगितले होते.

हा फॉर्म्युला मान्य होण्याची शक्यता
शिवसेना - 151
भाजप - 130
घटक पक्ष - 07

एकही जागा नको, आठवलेंना सीएम करा
आमच्या जागा घटवण्यासाठी शिवसेना- भाजपची ही खेळी आहे. मात्र आम्ही महायुतीसोबत आहोत. आम्हाला एकही जागा देऊ नका. फक्त अडीच वर्षांसाठी रिपाइं नेते रामदास आठवले यांना मुख्यमंत्री आणि रासपचे नेते महादेव जानकर यांना उपमुख्यमंत्री करा, असे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

भाजपची घासाघीस
इतर पक्षांतून येणा-यांना उमेदवारी देण्यासाठी पूर्वी शिवसेनेकडे असलेल्या जागांसाठी भाजप आग्रही आहे. आता मिळणा-या वाढीव जागांत भाजपला खालील मतदारसंघ हवे आहेत-
१. गंगापूर - प्रशांत बंब
२. भोकर - माधव किन्हाळकर
३. लातूर - शैलेश लाहोटी
४. धुळे शहर - अनिल गोटे
५. तासगाव - अजित घोरपडे
६. भुसावळ - संजय सावकारे

आमदार बंब भाजपमध्ये
सात वर्षांपूर्वी भाजपमधून बाहेर पडलेले गंगापूरचे अपक्ष आमदार प्रशांत बंब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये परतले आहेत. मंगळवारी मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश झाला.