आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena BJP Not Give Rajyasabha Seat To Athwale

आठवलेंना राज्यसभेची जागा देण्यास शिवसेना-भाजपात टोलवाटोलवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शरद पवारांची साथ सोडून भगवा खांद्यावर घेतलेल्या रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांची महायुतीतही कुचंबणा होत आहे. खासदारकी मिळविण्याच्या आशेवर बसलेल्या आठवले यांना राज्यसभेची जागा देण्यावरून शिवसेना-भाजप टोलवाटोलवी करीत आहे. भाजपकडे राज्यसभेची जागा नसल्याने शिवसेनेने ती द्यावी अशी आठवलेंची मागणी आहे. मात्र खासदारकी मिळत नसल्याची चिन्हे असल्याने शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर महायुतीबाबत आठवले निर्णय घेतील, अशी माहिती रिपाइंतील सूत्रांनी दिली.


आठवले यांनी काही महिन्यांपासूनच महायुतीने जागा वाटपाबाबत चर्चा करावी, असा आग्रह शिवसेना- भाजप युतीकडे धरला होता. परंतु त्यांच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष दिले नव्हते.


गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी चर्चा करून रिपाइंला लोकसभेच्या तीन व राज्यसभेची एक जागा देण्यात येईल, अशी समजूत घातली होती. मात्र राज्यसभेची जागा आठवलेंनी भाजपकडे
मागावी, असे उद्धव यांनी सुचविले होते. तर रिपाइं हा शिवसेनेचा मित्रपक्ष असल्याने त्यांनीच निर्णय घ्यावा, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे.


उद्योगपती धूत यांची फेरनिवड निश्चित, दुसरी जागा अधांतरी
रिपाइंच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, भाजपकडे राज्यसभेची महाराष्‍ट्रात एकच जागा असून ती पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांना देण्यात आली आहे. शिवसेनेकडे दोन जागा आहेत. त्यापैकी एक जागा प्रसिद्ध उद्योजक राजकुमार धूत यांना, तर दुसरी ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांना देण्यात आली आहे. धूत यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत व्यावसायिकांची एक बैठक आयोजित करून उद्धव ठाकरे यांना निमंत्रित केले होते. त्यामुळे त्यांना दुस-यांदा संधी मिळू शकते. दुस-या जागेबाबत संख्याबळाच्या अडचणी आहेत.


‘काँग्रेस-राष्‍ट्रवादीत मिळेल आठवलेंना मानाचे स्थान’
रिपाइंच्या नेत्याने सांगितले की, राज्यात दलित मते 9 ते 10 टक्के आहेत. ही जनता आपल्या नेत्याचा अपमान सहन करणार नाही. रिपाइंमुळेच कल्याण-डोंबिवली, मुंबई आणि ठाणे महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आल्या. तसेच मिलिंद वैद्य आणि खडकवासला येथील जागाही युती जिंकू शकली. मात्र आठवलेंचा अपमान झाला तर त्याचा फटका युतीला नक्कीच बसेल. आठवले यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीत जायचे ठरवले तर त्यांना मानाचे स्थान मिळेल. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहून आठवले महायुतीत राहायचे की नाही याचा निर्णय कदाचित घेतील.


शिवसेनेकडे एकच जागा, रिपाइंला कशी मिळेल ?
राज्यसभेसाठी 37 मतांची आवश्यकता असते. एक जागा उद्योगपती धूत यांना दिल्यानंतर दुस-या जागेसाठी शिवसेनेकडे फक्त 12 मते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे ख-या अर्थाने पक्षाकडे हक्काची एकच जागा आहे. ती जागा ते आठवले यांना देणार नाहीत हे नक्की. त्यामुळे आठवलेंची अडचणच होणार आहे.