आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली निकालाचा परिणाम, 100 दिवसानंतर महाराष्ट्रात युती सरकारची समन्वय समिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिल्लीतील अनपेक्षीत निकालानंतर महाराष्ट्रात भाजप - शिवसेना युती सरकारने शंभर दिवसानंतर तातडीने समन्वय समिती स्थापन केली आहे. चार सदस्यीय समिती दोन्ही पक्षात समन्वय राहील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
दिल्ली विधानसभा निडणुकीत आम आदमी पार्टीने मिळविलेल्या विक्रमी विजयाचे पडसाद मंगळवारपासून राज्यातही पडताना दिसत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्षाचे सांत्वन करण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेनेला चिमटे काढले. या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या समन्वय समितीला महत्त्व प्राप्त होत आहे.
मंगळवारी उशिरा रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती स्थापण्यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले जाते. या समितीत भाजप आणि शिवसेनेकडून प्रत्येकी दोन सदस्य आहेत. समितीत भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत पाटील तर, शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि अनिल देसाई असणार आहेत. शिवसेना - भाजपमध्ये सुरु असलेल्या कुरबुरीनंतर ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
युती सरकार मधे काम करत असताना दोन्ही पक्षात समन्वय राहावा यासाठी समिती काम करणार आहे. सरकारमधील वाद चव्हाट्यावर न येता ते बंद खोलीत सोडवले जावेत ही यामागील भूमिका आहे.
(संग्रहित छायाचित्र )