आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच सत्तेचा वाटा देण्यासाठी शिवसेनेचा भाजपवर दबाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजप शिवसेनेला सोबत घेणार असल्याच्या बातम्या येत असतानाच अद्याप भाजपने भूमिका जाहीर न केल्याने शिवसेना अस्वस्थ आहे. फडणवीस यांनी शुक्रवारी शपथ घेतल्यानंतर दुस-याच दिवसापासून शिवसेनेने भाजपवर दबाव वाढविला आहे. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच भाजपने युतीबाबत निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही विरोधात मतदान करू असा इशारा शिवसेनेने भाजपला दिल्याचे वृत्त आहे. बहुमत सिद्ध केल्यानंतर सत्तावाटपाचा पुढील निर्णय घेऊ असे भाजपने सांगितल्यानंतर सेनेने ही भूमिका घेतली आहे. फडणवीस यांचे सरकार 12 नोव्हेंबर रोजी बहुमत सिद्ध करणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य आहेत. भाजपकडे सध्या 121 आमदार आहेत. मित्रपक्षाचा 1, अपक्ष व इतर काही छोट्या पक्षांचे मिळून भाजपकडे 135 च्या आसपास संख्याबळ आहे. याचबरोबर 288 सदस्यांच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 41 आमदार आहेत. राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. तसेच बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी राष्ट्रवादीचे आमदार तटस्थ राहतील असे पक्षाध्यक्ष शरद पवारांनी जाहीर केले आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध केल्यानंतर भाजप शिवसेनेला सत्तेत सामील करून घेईल किंवा नाही याची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यानंतर भाजप शिवसेनेला सत्तेत सामील करून घेणार असल्याच्या बातम्या येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुधीर मुनगंटीवर यांच्यासह भाजपचे दिल्लीतील नेतेही शिवसेनेसोबत चर्चा सुरु असल्याचे सांगत आहेत. तसेच यातून चांगले बाहेर येईल असा विश्वास व्यक्त करीत आहेत. मात्र, शिवसेना भाजपवर विश्वास ठेवायला तयार नाहीये. त्यामुळेच बहुमत सिद्ध करण्यापूर्वी सत्तेत सामील करून घ्या यासाठी सेनेने भाजपवर दबाव वाढविला आहे. भाजपने सत्तेत सोबत न घेतल्यास शिवसेनेने विरोधात बसण्याची तयारी केली आहे.