मुंबई - ‘एेंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण’ हे ब्रीद घेऊन काम करत असलेली शिवसेना १९ जूनपासून सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या वर्षात सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी सामाजिक कामे करून घराघरांत पोहोचवण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले अाहे, अशी माहिती शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
काही दिवसांपूर्वीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांची एक बैठक घेऊन पक्षाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील कामांबाबत चर्चा केली होती. आता देसाई आमदारांची बैठक घेऊन कार्यक्रमाची रूपरेषा तयार करत आहेत. मंगळवारी झालेल्या बैठकीला शिवसेनेचे आमदार आणि मंत्री उपस्थित होते. देसाई यांनी सांगितले, ‘सुवर्णमहोत्सवी वर्ष जोमाने साजरे करण्याचे आम्ही ठरवले आहे. जनतेच्या पाठिंब्याने आम्ही ५० व्या वर्षात पदार्पण करत आहोत. त्यामुळे जनतेसाठीच योजना आखण्याचा विचार आहे. प्रत्येक आमदाराने एखादे गाव दत्तक घेऊन त्या गावाचा विकास करायचा, अशी एक योजना आहे. त्या गावात वीज, पाणी उपलब्ध करून देण्याचे काम दत्तक घेणा-याला करावयाचे आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही खासदारांच्या बैठकीत याच गोष्टीवर भर दिला होता. या योजनांबाबत आमच्या आणखी बैठका होणार असून त्याबाबतची सविस्तर माहिती लवकरच देऊ,’ असेही देसाई यांनी सांगितले.
पुन्हा स्वबळाची तयारी
निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी सुवर्णमहोत्सवी वर्षात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, अशी घोषणा जाहीर सभेत केली होती. भाजपबरोबर गेलो असतो तर शिवसेना संपली असती, असेही म्हटले होते. निवडणुकीनंतर शिवसेनेला चांगलेच झुलवल्यानंतर भाजपने सत्तेत वाटा दिला. त्यामुळे शिवसेना सत्तेत तरी आली. सत्ता उपभोगत असतानाच स्वबळावर पुढील विधानसभा निवडणुकीत सत्ता स्थापन करण्याचे मनसुबे शिवसेना आखत आहे आणि याची तयारी सुवर्णमहोत्सवी वर्षापासून केली जाणार असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली.