आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Comment On Gujrat Cm Narendra Modi For Uttarakhand Flood Issue

नरेंद्र मोदींच्या \'गुजरात एके गुजरात\'चा शिवसेनेकडून समाचार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- उत्तरांखडातील भयंकर महाप्रलयाने संपूर्ण देश हादरला आहे. मृतांच्या आकड्याने पाच हजारी ओलांडली आहे. बेपत्ता किती तो आकडा शोधणे तसे कठीणच आहे. हे राष्ट्रीय संकट आहे आणि संपूर्ण देशांनी एकत्र राहून आलेल्या नैसर्गिक संकटाशी दोन हात करायला पाहिजे. परंतु देशाचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून गाजावाजा होत असताना नरेंद्र मोदी यांनी केवळ 'गुजरात एके गुजरात' करावे. केवळ गुजरात राज्यातील यात्रेकरूंचे दु:ख समजून घ्यावे, अशी भूमिका देशासाठी मारकच असल्याचे सांगून शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखातून उद्धव ठाकरें यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

सध्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची 'हवा' आहे. ती 'हवा' असणारच म्हणा, कारण मोदींसाठी जी प्रसिद्धी यंत्रणा राबत आहे ती तर 'भन्नाट' आहे. पण कधी कधी ते बूमरॅंग करतात हेही लक्षात घेतले पाहिजे.

उत्तरांखंडात दाखल झालेल्या नरेंद्र मोदी यांनी मात्र राज्या-राज्यात भेदभाव केल्याचे प्रकर्षाने जाणवले. मोदी उत्तराखंडात गेले व 15 हजार गुजराती यात्रेकरूंना वाचवले. त्यांना सुखरुप घरी पोचवले आणि तेही पोहचले.
मोदींच्या आदेशानुसार 80 इनोव्हा गाड्यांमधून शेकडो यात्रेकरूंना डेहराडून विमानतळापर्यंत आणले त्यानंतर चार बोईंग विमानांमधून गुजरातला नेण्यात आले. या कामाबद्दल मोदींसह त्यांच्या सरकारचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. परंतु मोदी यांनी फक्त 'गुजरात एके गुजरात' करून केवळ गुजरात राज्यातील यात्रेकरूंचे दु:ख समजून घ्यावे, याचे दु:ख आहे, असा चिमटाही ‍काढण्यात आला आहे.

आपत्तीच्या प्रसंगी संकुचित किंवा प्रादेशिक नव्हे तर 'राष्ट्रीय' विचार करणे आवश्यक आहे. निसर्गाच्या प्रकोपाशी सामना करणे कठीण असते व याचा अनुभव अमेरिका, जापान सारख्या बलदंड राष्ट्रांनी घेतला आहे. त्यांच्यातली 'एकजुटी' शिकण्यासारखी असल्याचा सल्लाही दिला आहे.

उत्तराखंडातील ढगफुटीनंतर घाटीमध्ये अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी आलेल्या आपल्या लष्कर आणि आयटीबीपीच्या (इंडो- तिबेटियन बॉर्डर फोर्स) जवानांनी मात्र बचाव कार्यात भेदभाव केला नाही. अडकलेल्या लोकांनी सुरक्षित स्थळी नेले. त्यावेळी त्यांनी असा विचार केला नाही की अडकलेल्या भाविकांचा आणि यात्रेकरूंचा हा जत्था गुजरातचा आहे, महाराष्‍ट्राचा आहे, राजस्थानचा आहे की, उत्तरप्रदेश, बिहारचा आहे. त्यांच्या दृष्टीने अडकेल्या प्रत्येक व्यक्तीचा जीव वाचविण्याचे महत्त्वाचे होते.

गुजरात सरकारने ज्याप्रमाणे हेलिकॉप्टर्स व विमाने पाठवर्ली तशीच यंत्रणा महाराष्‍ट्र सरकारनेही राबवली. महाराष्‍ट्राच्या यात्रेकरुंना सुखरुप राज्यात येता यावे म्हणून महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत: दिल्ली आणि डेहराडूनला धाव घेऊन राज्याचे एक मंत्री सुरेश धस व बड्या कार्यक्षम अधिकार्‍यांचा ताफा डेहराडूनला तैनात ठेवला.

राज्यातील यात्रेकरूंच्या सुटकेसाठी हवाई यंत्रणा पाठवताना अन्य राज्यातील अडकून पडलेल्या लोकांनाही वार्‍यावर सोडू नका, अशा सुचनाही पृथ्वीराज चव्हाणांनी संबंधित यंत्रणांना केली होती. चव्हाण यांनी या संकटात महाराष्ट्राच्या दिलदारीचे दर्शन देशाला घडवले, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी कौतुक केले आहे.

दरम्यान, उत्तराखंडमध्ये पोहचलेल्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुरग्रस्तांना मदत करताना प्रांतभेद केल्याप्रकरणी शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचा राजकीय अर्थ काढू नये असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.