आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Criticise Over Maharashtra Sadan Issue

\'चपाती\'ला धार्मिक रंग द्याल तर गाठ आमच्याशी आहे! शिवसेनेने सुनावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- उद्धव ठाकरे)
मुंबई- शिवसेना सर्व धर्मांचा सन्मान करते व हाच आमचा संस्कार आहे. जोपर्यंत धर्माची फालतू मिजास कोणी दाखवत नाही तोपर्यंत आम्हाला काहीच घेणेदेणे नाही. ज्याने त्याने आपापला धर्म घरात व मनात सांभाळावा. श्रद्धांचा विषय व्यक्तिगत आहे, पण त्याचा असा राजकीय बाजार करून शिवसेनेस बदनाम करण्याचा प्रयत्न होणार असेल तर मात्र गाठ आमच्याशी आहे, अशी भूमिका शिवसेनेने दिल्लीतील महाराष्ट्र सदन घटनेबाबत घेतली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील बेबंदशाहीविरुद्ध आवाज उठवणे हा जर अपराध असेल तर होय, हा अपराध आमच्या मर्दांनी दिल्लीत केला आहे. दिल्लीत महाराष्ट्राचा अपमान होत असेल तर हा अपमान शिवसेना सहन करणार नाही, असे सामनाच्या अग्रलेखातून ठणकावून सांगितले आहे.
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मिळणा-या निकृष्ट जेवणाची तक्रार शिवसेनेने मागील काही दिवसापूर्वी केली होती. त्यात बुधवारी वेगळे वळण मिळाले. शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी खानावळीच्या सुपरवायझरला ही चपाती खाण्यायोग्य आहे का हे सांगत चपाती तोंडात कोंबण्याचा प्रयत्न केला होता. यावरून बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. तसेच याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत शिवसेनेने आपल्या 'सामना' या मुखपत्रातून धार्मिक रंग देणा-यांवर सडकून टीका केली आहे.
अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्रातून नव्याने निवडून गेलेल्या खासदारांचा मुक्काम सध्या नव्या महाराष्ट्र सदनात आहे व गेल्या महिनाभरापासून त्यांची अवस्था ‘गोठा’ बरा, पण या ‘सदनी’ राहणे नको अशीच झाली आहे. पिण्याचे पाणी नाही, स्वच्छता नाही, कॅण्टीनची धड व्यवस्था नाही. हा सर्व मनस्ताप रोकडा पैसा मोजून विकत घ्यावा लागत असेल तर संतापाचा भडका उडणारच. तसा तो उडाला आहे. मात्र या भडक्यास राजकीय व धार्मिक रंग देऊन वणवा पेटविण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या मंत्रालयातून होत आहे. शिवसेना-भाजपचे खासदार आणखी महिना-दोन महिने नव्या सदनात राहतील व त्यांना संसदेकडून ‘घरे’ मिळाली की निघून जातील, पण महाराष्ट्र सदनात जो गैरव्यवहार, गैरप्रकार चालला आहे तो तसाच ठेवायचा काय? त्यावर शिवसेना खासदारांनी नव्या महाराष्ट्र सदनातील बजबजपुरीविरोधात हिमतीने आवाज उठविला. ही अरेरावी नसून एक आंदोलन आहे. कॅण्टीनचा ठेकेदार रोकडा पैसा मोजूनही जेवण नावाचा प्रकार, खासकरून ‘प्रयत्न’ करूनही न तुटणार्‍या ‘रबरी’ चपात्या खायला घालतो. या चपात्यांचा बोळा खरे तर राज्याचे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, मुख्य सचिव व दिल्लीत महाराष्ट्राचे म्हणून जे ‘कमिशनर’ बसले आहेत त्या बिपीन मलिकच्या तोंडात कोंबायला हवा, पण कॅटरिंग ठेकेदाराच्या तोंडाशी ही चपाती नेऊन ‘बाबारे, आम्ही जे कदान्न खातोय ते तू खाऊन दाखव’, असे जरा जोरात सांगितले म्हणून नसता गहजब कशाला? आता हा जो कोणी ठेकेदार आहे तो कोणत्या धर्माचा, पंथांचा, जातीचा आहे हे काय त्याच्या कपाळावर लिहून ठेवले होते? असा सवाल उपस्थित करीत धार्मिक रंग देणा-यावर हल्लाबोल केला आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका करताना अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र सदनातील भ्रष्टाचार व बजबजपुरी दाबण्यासाठी असे राजकारण करणारे व त्यास धार्मिक रंग देणारे स्वत:च्याच हाताने स्वत:साठी मोठा खड्डा खणत आहेत. त्या खड्ड्यात या कॉंग्रेसवाल्यांना कायमचे गाडून त्यावर माती टाकण्याचे काम महाराष्ट्राची जनता उद्या नक्कीच करणार आहे. दिल्लीतील नवे महाराष्ट्र सदन हा नक्की कुणाचा खासगी अड्डा झाला आहे? पुन्हा हा अड्डा बनविणार्‍या बिपीन मलिकला राज्याचे मुख्यमंत्री ‘प्रेयसी’प्रमाणे मांडीवर घेऊन बसतात. हा मराठी माणसाचा अपमान आहे. इतके मराठी खासदार दिल्लीत आवाज उठवतात. त्याची साधी दखल राज्याचे मुख्यमंत्री व मुख्य सचिव घेत नाहीत व संपूर्ण प्रकरणास ‘धार्मिक’ वळण देण्याचे ‘बायकी’ प्रयोग करतात. हा प्रकार महाराष्ट्राच्या इभ्रतीवर लांच्छन आणणारा आहे. लोकसभा निवडणुकीत याच राजकारणावर राज्याची मराठी जनता थुंकली आहे, तरीही यांना ना लाज ना लज्जा. आज जे कोणी स्वत:च्या भानगडी लपविण्यासाठी नव्या महाराष्ट्र सदनात धर्माचे राजकारण करीत आहेत, त्यांना एकच इशारा शेवटी देत आहोत, उद्याची महाराष्ट्राची राज्यकर्ती शिवसेना आहे हे त्यांनी विसरू नये! अशा शब्दांत सुनावले आहे.