आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Get 5 Cabinet, 7 State Ministries, Fadanvis Will Declare Alliance

जमलं एकदाचं! शिवसेनेला 5 कॅबिनेट, 7 राज्यमंत्रिपदे; फडणवीस करणार युतीची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/नवी दिल्ली - भाजपच्या सत्तेतील शिवसेनेच्या सहभागाचे घोडे मंगळवारी अखेर गंगेत न्हाले; परंतु घोषणा करण्याचा मुहूर्त मात्र लांबला आहे. सोमवार रात्रीपासून सुरू असलेल्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर शिवसेनेने सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. फुटीच्या भीतीने आपल्या स्वाभिमानाला मुरड घालत भाजपने देऊ केलेली ५ कॅबिनेट आणि ७ राज्यमंत्रिपदे पदरात पाडून घेऊन शिवसेना सत्तेत सामील होणार असून याबाबतची घोषणा बुधवारी होण्याची शक्यता आहे. शिवसेना बुधवारीच आपल्या मंत्र्यांची नावेही घोषित करणार असल्याचे सांगितले जात आहे.

युतीची अधिकृत घोषणा झाली नसली तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी तातडीने दिल्ली गाठून भाजप पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली. शिवसेनेशी युतीची आपण स्वत: घोषणा करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. रविवार आणि सोमवारी रात्री उशिरा शिवसेना नेत्यांची सत्तेतील सहभागाबाबत चर्चा झाली. मंगळवारी मातोश्री येथे उद्धव
ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांशी दीर्घ चर्चा केली. ३१ ऑक्टोबरपासून सुरू झालेला शिवसेना-भाजपच्या मधुमिलनाचा प्रवास मंगळवारी (२ डिसेंबर) रोजी पूर्णत्वास गेल्याने शिवसेना नेत्यांमध्ये आनंद पसरला आहे. त्यामुळेच मंत्रिपद मिळवण्याच्या आशेने शिवसेना आमदार मातोश्रीच्या बाहेर घिरट्या घालत असल्याचे चित्रही मंगळवारी दिसून आले आहे.

एका कॅबिनेटवर अडले होते घोडे
शिवसेनेला ५ कॅबिनेट मंत्रिपदे आणि सात राज्यमंत्रिपदे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप चार कॅबिनेट द्यायला तयार होता, परंतु शिवसेना पाचवर अडून बसल्याने अखेर भाजपने पाच कॅबिनेट देण्याचे मान्य केल्याचे बोलले जात आहे.

सत्तेच्या मजबुरीने केला समझोता
भाजपला बिनशर्त पाठिंबा देणा-याराष्ट्रवादी काँग्रेसने सरकार टिकवणे ही आमची जबाबदारी नसल्याचे सांगून टाकल्यामुळे पाच वर्षे निर्धोक सरकार चालवायचे तर शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याशिवाय भाजपपुढे अन्य पर्यायच राहिला नव्हता. त्यातूनच हा समझोता झाला.

भाजपविरोधात बोलू नका : उद्धव ठाकरे
शिवसेना-भाजप मनोमिलनाचे संकेत असल्याने भाजपविरोधात बोलू नये असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना दिल्याचे समजते. युतीची औपचारिक घोषणाच बाकी असल्याने कोणताही वाद उद‌्भवू नये म्हणून त्यांनी हे आदेश दिल्याचे सांगण्यात येते.
ही खाती मिळणार शिवसेनेला उद्योग, पर्यावरण, उत्पादन शुल्क, आरोग्य, परिवहन अशी खाती मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद हवे होते; पण ते काही मिळाले नाही.

कोण होणार मंत्री?
दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, एकनाथ शिंदे, विजय शिवतारे, नीलम गो-हे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, अर्जुन खोतकर, रवींद्र वायकर किंवा सुनील प्रभू, राजन साळवी.