मुंबई - एकीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेनेला सत्तेची घाई नसल्याचे सांगत असले तरी दुसरीकडे नेते लवकरात लवकर राज्यातील भाजपच्या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी पक्षाकडून पाठपुरावा केला जात असल्याचे शिवसेना नेत्यांशी बोलताना जाणवत आहे. शिवसेना नेते अनिल देसाई यांनीही ‘आमचा पक्ष लवकरच सत्तेत सहभागी होईल’ असे सांगत त्याला दुजोरा दिला. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या राज्यात आठ मंत्रिपदे आणि केंद्रात एखादे राज्यमंत्रिपद मिळेल असे सांगितले जात आहे.
शिवसेनेने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून उपमुख्यमंत्रिपदासह १० ते १२ मंत्रिपदांची मागणी केलेली आहे. ‘दिव्य मराठी’ने चार दिवसांपूर्वीच याबाबतचे वृत्त दिले होते. मात्र भाजप त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात सध्या आठ मंत्रिपदे देण्यास तयार असून त्यापैकी पाच कॅबिनेट तर तीन राज्यमंत्रिपदे असतील. मात्र कोणत्याही परिस्थितीत भाजप उपमुख्यमंत्रिपद देण्यास तयार नाही, असेही सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, उपमुख्यमंत्रिपद हे तसे फक्त नावाचेच असते. या पदाला घटनेत काही अधिकार नसल्याने शिवसेना या पदाचा आग्रह सोडून केंद्रात आणखी एक मंत्रिपद मागणार आहे. शिवसेनेची ही मागणी भाजप नेते मान्य करतील असे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेनेला केंद्रात राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला आणखी एखादे मंत्रिपद दिले जाऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे.
खात्यांबाबत मोदी, शहांशी चर्चा
शिवसेना नेते अनिल देसाई यांनी सांगितले की, भाजप नेत्यांशी बोलणी सुरू असून लवकरच हा तिढा सुटेल आणि शिवसेना सत्तेत सहभागी होईल. बहुमत सिद्ध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष अधिवेशनापूर्वी म्हणजेच १० नोव्हेंबरपूर्वी शिवसेना सत्तेत सहभागी होईल, असे सांगितले जात आहे. शिवसेनेला कोणती मंत्रिपदे द्यायची याबाबत भाजप अध्यक्ष
अमित शहा आणि पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली असून तीन-चार दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती भाजपतील सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यापेक्षा जुना मित्र असलेल्या शिवसेनेचा पाठिंबा घेणे योग्य ठरेल असे भाजपच्या नेत्यांना आता वाटत आहे. त्यामुळे शिवसेनेला आता जास्त न दुखावता, योग्य मान-सन्मान देऊन अधिवेशनापूर्वी सत्तेत सहभागी करून घेतले जाईल, असेही सूत्रांनी सांगितले.