आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्णमहोत्सवी मेळाव्यात आदित्यचेही भाषण; शिवसेना देणार स्वबळाचा नारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सुवर्णमहोत्सवी वर्ष समारोपाचे अाैचित्य साधून शिवसेनेतर्फे १९ जून रोजी गोरेगाव येथील एनएसई संकुलात एका भव्य मेळाव्याचे अायाेजन करण्यात अाले अाहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबराेबरच या मेळाव्यात प्रथमच युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार असल्याचे समजते.

या कार्यक्रमाला सुमारे २५ हजार शिवसैनिक उपस्थित राहाणार असून या माध्यमातून मुंबई महापालिका निवडणूक व अागामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे संकेतच दिले जाणार असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली.

शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ रोजी झाली. गेल्या वर्षी शिवसेनेने सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने रस्ते तुंबले आणि शिवसेनेला हा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराने एखादे गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करायचा, त्या गावात वीज, पाणी उपलब्ध करून द्यायचे असे ठरवण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी सामाजिक कामांवर भर देऊन सुवर्णमहोत्सव साजरा करण्याचे शिवसेनेने ठरवले होते.

गेल्या वर्षभरात शिवसेनेने केलेल्या कामांची माहिती १९ जून रोजीच्या कार्यक्रमात शिवसैनिकांसमोर सादर केली जाणार आहे. शिवसेना मंत्र्यांची कामे, आमदारांची कामे तसेच मुंबईत पक्षाने केलेल्या कामांचीही ध्वनी चित्रफित तयार करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभरातून पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले अाहे. पावसाचा परिणाम हाेऊ नये म्हणून गोरेगाव येथील एनएसई संकुलात सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

एनएसई संकुल शिवसेनेला लाभदायी
एनएसई संकुल पक्षाला लाभदायी ठरत असल्याची शिवसेनेत भावना अाहे. मुंबई पालिका, विधानसभेच्या गेल्या अनेक निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात याच संकुलात केली हाेती. शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने अाता मुंबई मनपामध्ये एकहाती सत्ता आणि विधानसभा निवडणुकीकरिता
‘मिशन १८५’ हाती घेतले असून त्याचा नारळही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते याच कार्यक्रमात फोडला जाण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली.

जबाबदारी देसाईंकडे
या मेळाव्याची जबाबदारी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि अन्य नेत्यांवर सोपवण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाबाबत सुभाष देसाई यांनी सांगितले, ‘सुवर्णमहोत्सवी वर्षाची सांगता भव्य प्रमाणात आम्ही करणार असून त्यानुसार या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. शिवसेनेच्या कामांची माहिती उपस्थितांना देण्यात येणार असून एका सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात अाले अाहे.’
बातम्या आणखी आहेत...