आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Said They Are Ready To Seat In Apposition

..तर देवेंद्रांच्या विरोधात मतदान, उद्धव ठाकरे यांचा इशारा; राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यास विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भगवा आतंकवाद असा शब्द जन्माला घातला आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार पाडले त्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा भाजप घेणार असेल तर शिवसेना विरोधात मतदान करील, अशा रोखठोक शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी आपली भूमिका स्पष्ट केली. सत्तेसाठी आम्ही लाचार नाहीत, एकटे बसण्याची तयारी आहेे, असे सांगतानाच सत्तेत सहभागासाठी अजून दोन दिवस वाट पाहा, असे म्हणत उद्धव यांनी अजून सकारात्मक असल्याचेही दाखवून दिले.

शिवसेनेचे आमदार व खासदारांची शिवसेना भवनात बैठक झाली. या वेळी पक्षाचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड केल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. सत्तेत सहभागाबाबत उद्धव म्हणाले, विधानसभा अध्यक्ष कोणत्या पक्षाचा असेल त्यावर आमचा पाठिंबा अवलंबून असेल. अध्यक्षांचे नाव सर्वानुमते जाहीर व्हावे. तसेच देशातील हिंदूंना संपवण्याची भाषा केली जात आहे. देशविघातक शक्ती वाढत असताना हिंदुत्ववादी शक्तींचे विभाजन होऊ नये अशी शिवसेनेची भूमिका आहे. परंतु भगवा आतंकवाद म्हणणाऱ्या शरद पवार यांनी भाजपला पाठिंबा देऊ केला आहे. भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार की नाही हे स्पष्ट करावे. भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर शिवसेना विरोधात बसेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या मुद्द्यावर उद्धव म्हणाले, खुद्द शरद पवार यांनीच नेते भेटले पण कोणताही प्रस्ताव नव्हता, असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांनाच याबाबत विचारा.

मुद्दे आणि युक्तिवाद
- अनिल देसाई शपथ न घेता का परतले?
उद्धव : अनिल देसाई यांना मीच बोलावले. राष्ट्रवादीबाबत निर्णय कळवावा असे आम्ही सांगितले होते. पण भाजपने काहीच स्पष्ट केले नाही. म्हणून मी देसाईंना परत बोलावले. लाचारी करून आम्ही सत्तेत जाणार नाही. राज्यात स्थिर सरकार हवे आहे, परंतु महाराष्ट्र, मुंबई तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पाठिंबा नाही.
केंद्रातील सत्तेतून तुम्ही बाहेर पडणार का?
उद्धव : तुम्हाला (पत्रकारांना) इतकी घाई का आहे. वेळ येईल तेव्हा आम्ही आमची भूमिका स्पष्ट करूच.
भाजपला विचारासाठी किती वेळ देणार?
उद्धव : लवकरात लवकर भाजपने निर्णय घ्यावा.
सुरेश प्रभू शिवसेना सोडून भाजपत गेले?
उद्धव : केंद्रात अटलजींचे रालोआचे सरकार होते, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच या सुरेश प्रभू यांचे नाव मंत्रिपदासाठी सुचवले होते.
शिवसेना विरोधात बसल्यास फुटेल!
पंधरा वर्षे सत्तेबाहेर राहणाऱ्या शिवसेनेला सत्तेत वाट्याची संधी आहे. अनेक आमदार इच्छुक आहेत. पण विरोधात बसल्यास १२ ते १५ आमदार भाजपच्या गळाला लागू शकतात. सुत्रांनुसार अनेक जण भाजपच्या संपर्कात आहेत. भुजबळ, राणे जसे आमदारांना घेऊन बाहेर पडले व पुन्हा आमदारांना निवडून आणले. तसेच होऊ शकते. पक्षांतरासाठी दोन तृतीयांश म्हणजे सुमारे ४२ आमदार लागतील. एवढे आमदार फुटणे दुरापास्त आहे.
भाजपचे ‘वाट पाहा’, पण बहुमताची खात्री
भाजपची सध्या वेट अँड वाॅच भूमिका राहील. तूर्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने विश्वासदर्शक ठरावात सरकार तरेल, अशी भाजपला खात्री आहे. सहा महिन्यांत इतर पक्षांतील अस्वस्थ व निवडून येण्याची क्षमता असलेले आमदार हेरून त्यांना राजीनामा द्यायला लावायचा व भाजपच्या तिकीटावर निवडून आणायचे अशी भाजपची रणनीती आहे. येदियुरप्पा सरकारसाठी भाजपने कर्नाटकात पाच आमदारांची अशीच बेगमी केली होती.
आजपासून अधिवेशन
विधिमंडळाचे सोमवारपासून तीन दिवसीय अधिवेशन होत आहे. हंगामी अध्यक्ष जीवा पांडु गावीत नव्या सदस्यांना शपथ देतील. बुधवारी राज्यपालांचे अिभभाषण, विधानसभा अध्यक्षांची निवड होईल. सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाईल.
पुढील स्लाइडवर वाचा, सध्याचे बलाबल आणि सत्तास्थापनेच्या शक्यता...