आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Lok Sabha Candidate Babanrao Gholap Sentenced To 3 Years In Prison

बबनराव घोलप यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने जुलै 2013 मध्ये दिलेल्या ऐतिहासिक निकालानुसार बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याबद्दल सत्र न्यायालयाने तीन वर्षांची सर्शम कारावासाची शिक्षा ठोठावलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांना किमान सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही. त्यांची आमदारकी संपुष्टात येणार असून, उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेस स्थगिती दिली तरीही ना त्यांचे सदस्यत्व वाचेल, ना त्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार असेल.

व्ही. ए. दौलताबादकर यांच्या विशेष न्यायालयाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत घोलप यांना शुक्रवारी तीन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. 10 जुलै 2013 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीद्वयी ए. के. पटनायक आणि एस. जे. मुखोपाध्याय यांच्या खंडपीठाने सत्र न्यायालयात दोन वर्षे वा त्याहून अधिक कालावधीची तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यास लोकप्रतिनिधींचे संसद वा विधिमंडळ सदस्यत्व तत्काळ संपुष्टात येईल आणि संबंधित व्यक्ती पुन्हा निवडणूक लढण्यास पात्र राहणार नाही, असा ऐतिहासिक निकाल दिला होता.

1951च्या लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या कलम 8 (3) नुसार दोन वर्षांहून अधिक काळाचा तुरुंगवास ठोठावण्यात आल्यास संबंधित व्यक्ती संसद वा विधिमंडळ सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरेल, अशी तरतूद होती. मात्र, याच कायद्याच्या पुढच्या कलमात म्हणजे कलम 8 (4) मध्ये ही अपात्रता टाळणारी तरतूद होती. ती म्हणजे जर तीन महिन्यांत या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली किंवा ही शिक्षा सुनावणार्‍या न्यायालयानेच शिक्षेत बदल केला तर सदस्यत्व रद्द होणार नाही. लिली थॉमस आणि लोकप्रहरी यांनी संयुक्तरीत्या एका जनहित याचिकेद्वारे लोकप्रतिनिधित्व कायद्याला आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या ऐतिहासिक निकालात अपात्रतेपासून वाचवणारे कलम 8 (4) हे बेकायदेशीर ठरवत रद्द केल्याने संसद वा विधिमंडळ सदस्य आपली खासदारकी वा आमदारकी तत्काळ गमावतील.

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि रशीद मसूद या दोन खासदारांना विशेष न्यायालयांनी अशीच शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांची खासदारकी तत्काळ रद्द करण्यात आली. तसेच, घोलप यांची आमदारकी आता कोणत्याही क्षणी रद्द होईल. याशिवाय, त्यांना किमान सहा वर्षे तरी निवडणूक लढवता येणार नाही.