आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena MNS News In Marathi, Maharashtra Assembly Election 2014, Divya Marathi

मतदारांना काय भावणार? ब्ल्यू प्रिंट की व्हिजन डॉक्युमेंट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निवडणुकीचा बिगुल वाजला आणि सर्वच पक्षांनी जाहीरनाम्यावर शेवटचा हात फिरवण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेने ‘व्हिजन डॉक्युमेंट’ सादर करून आघाडी घेतली आहे, तर मनसेप्रमुख राज ठाकरेही लवकरच बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ब्ल्यू प्रिंट घेऊन जनतेसमोर येणार आहेत. मात्र, आघाडीच्या जाहीरनाम्यापेक्षा सध्या जनतेत ठाकरे बंधूंच्या ‘व्हिजन’ आणि ब्ल्यू प्रिंटचीच सर्वाधिक चर्चा आहे.

नारायण राणे यांनी ब्ल्यू प्रिंट आणि व्हिजन ची खिल्ली उडवत या दोन्हींचा उपयोग आमचे सरकार आल्यानंतर राज्याच्या विकासासाठी करता येईल, असा उपरोधिक टोलाही लगावला होता. असे असले तरी एकूणच रणधुमाळीत खरी लढाई ब्ल्यू प्रिंट आणि व्हिजन डॉक्युमेंटमध्ये असेल आणि ज्यांच्या योजना जास्त आकर्षक असतील तिकडेच मतदार आकर्षित होतील असे दिसून येत आहे.

मनसेच्या ‘ब्ल्यू िप्रंट’ने अपेक्षाभंग करू नये
यूपीएससीची तयारी करीत असलेल्या इंद्रजित चरणकरने ब्ल्यू प्रिंट आणि व्हिजन डॉक्युमेंटबद्दल म्हटले की, मनसेची ब्ल्यू प्रिंट येणार-येणार हे अनेक वर्षे ऐकतोय. खूपच गोपनीयता बाळगल्याने त्यात नेमके काय आहे ते ठाऊक नाही, परंतु शिवसेनेने व्हिजन सादर करून राज्यासाठी काय करणार ते दाखवून दिले आहे. त्यामुळे व्हिजनच्याच माध्यमातून विकास होईल, असे वाटते. ब्ल्यू प्रिंटमध्ये जर व्हिजनमधीलच मुद्दे असतील तर ब्ल्यू प्रिंटला काहीही अर्थ राहणार नाही.

जनतेच्या समस्यांनाच प्राधान्य
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ब्ल्यू प्रिंटबाबत सांिगतले की, राज ठाकरे यांनी राज्याच्या संपूर्ण िवकासाचा यात विचार केला आहे. विकास योजना आखताना त्या घाईघाईत नव्हे, तर पूर्ण अभ्यास करून आखायच्या असतात. महाराष्ट्राच्या जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर ही ब्ल्यू प्रिंट असेल. जनतेला दैनंदिन जीवनात ज्या समस्यांना सामोरे जावे लागते त्या दूर करण्याचा प्रयत्न आमच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये असेल आणि त्यामुळे राज्याचा नक्कीच विकास होईल. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, उद्योग व्यवसाय अशा सर्वच मुद्द्यांवर ब्ल्यू प्रिंटमध्ये सविस्तर योजना मांडल्या आहेत. २५ सप्टेंबरला जनतेला या योजनांची माहिती होईलच.

कामांचे सादरीकरण जनतेसमोरच
शिवसेनेचे व्हिजन डॉक्युमेंट सादर करताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, आम्ही केवळ कागदावर योजना आखत नाहीत, तर त्या पूर्ण कशा होतील याचे सादरीकरणही ई-प्रबोधन आणि शिव आरोग्य सेवा योजनेतून दाखवत आहोत. त्यामुळे आम्ही नक्की काय करणार हे जनतेसमोर आहे. आता जनतेनेच ठरवायचे की तयार असलेल्या योजना स्वीकारून विकास करायचा की नाही?

पोटापाण्याचे काय?
‘कसली ब्ल्यू प्रिंट आणि कसले व्हिजन? आम्हाला दोन वेळचे जेवण मिळणे मुश्कील झाले आहे,’ असा प्रश्न दादर येथील फुलांची विक्री करणाऱ्या विनायकने उपस्थित केला. ‘सगळे पक्ष मोठ्या लोकांचा विचार करतात, आमच्यासारख्या सामान्यांचा कोणी विचार करीत नाही,’ अशी खंतही त्याने बाेलून दाखवली.