आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत रंगले वायफाय युद्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई शहर वायफाय करण्याच्या मुद्द्यावरून बराच काळ शांत राहिलेले शिवसेना आणि मनसे हे पक्ष आता पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. महापालिकेतर्फे मुंबईकरांना मोफत वायफाय सेवा देण्याची घोषणा शिवसेनेकडून करण्यात आली असून शिवाजी पार्क येथे प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मात्र, शिवाजी पार्कमध्ये मनसेने अगोदरच वायफाय सेवा मोफत देण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत युतीला चांगले यश मिळाल्याने आत्मविश्वास दुणावलेल्या शिवसेनेने आता विधानसभेतही मुंबईतील जास्तीत जास्त जागा काबीज करण्याची रणनीती आखली आहे. त्यासाठी नवमतदारांना आकर्षित करण्याची योजनाही शिवसेनेने तयार केली आहे. या तरुण मतदारांना खुश करण्यासाठी अवघी मुंबई ‘वायफाय’मय करण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. या योजनेंतर्गत लवकरच मुंबईकरांना मोफत वायफाय सेवा पुरवण्यात येणार असून दादरच्या शिवाजी पार्क परिसरात पायलट प्रोजेक्ट राबवण्यात
येणार असल्याचेही ते म्हणाले. मात्र, त्यांच्या या घोषणेवर मनसेने हरकत घेतली आहे.

मनसेचे महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे हे या शिवाजी पार्क परिसराचे प्रतिनिधित्व करतात. आपण अगोदरच या योजनेवर काम सुरू केले असून सध्या शिवाजी पार्क वायफाय करण्यासाठी आवश्यक असलेली पायाभूत यंत्रणा बसवण्याचे काम जवळपास पन्नास टक्के पूर्ण झाले आहे, असा दावा देशपांडे यांनी केला आहे. तसेच शिवाजी पार्कात मोफत वायफाय सेवा पुरवण्याची आपली योजना ही महापालिकेच्या पैशातून नसून एका खासगी कंपनीच्या सहकार्याने आपण ही सेवा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उलट हे काम थांबवण्याचा प्रयत्न शिवसेनेने प्रशासनाच्या माध्यमातून
चालवला असल्याचाही आरोप देशपांडे यांनी केला.

मनसेतर्फे शिवाजी पार्क आणि विलेपार्ले पूर्व या दोन विभागांत मोफत वायफाय सेवा पुरवण्याचा प्रकल्प सध्या राबवण्यात येत आहे. त्यामुळे या परिसरात असलेल्या प्रत्येकाला आपल्या फोनवर 300 एमबी इतक्या मर्यादेपर्यंत मोफत इंटरनेट सर्फिंग करता येणार आहे. या चांगल्या योजनेचे श्रेय मनसेला मिळू नये म्हणूनच आता शिवसेनेने मुंबई वायफाय करण्याची घोषणा केल्याचा आरोपही देशपांडेंनी केला आहे.

राज ठाकरेंचा प्रचार होणार वायफाय
शिवाजी पार्क या परिसरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे राहतात. या मतदारसंघात मनसेचा आमदार असून सर्वच्या सर्व नगरसेवक हे मनसेचेच आहेत. नुकतीच राज ठाकरेंनी विधानसभा लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ते लढवणार असलेल्या सांभाव्य मतदारसंघांमध्ये दादर या मतदारसंघाचीसुद्धा चर्चा आहे. तसे झाल्यास राज ठाकरेंच्या प्रचारात या वायफाय यंत्रणेचा चांगलाच फायदा मनसेला होऊ शकेल. ही सेवा अस्तित्वात आल्यास मनसेला या परिसरातील रहिवाशांच्या फोनवर थेट प्रचार करता येणार असल्यानेच शिवसेनेला मनसेची ही योजना हाणून पाडायची आहे. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी अवघी मुंबई वायफाय करण्याची घोषणा केल्याची चर्चा सध्या मनसेमध्ये सुरू आहे.

(डेमो पिक)