आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेने आधी सत्तेतून बाहेर पडावे: विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शेतकऱ्यांच्या माफीच्या मुद्द्यावर आपल्या आमदारांना आक्रमक भूमिका घेण्यास सांगण्याऐवजी शिवसेनेने भाजप सरकारमधून बाहेर पडलेच पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

शिवसेनेचे आमदार सभागृहाच्या हौद्यात उभे राहून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे पक्षाचे मंत्री मात्र सत्तेचा आनंद लुटत आहेत. हे काय चालले आहे? ही तर  दुटप्पी भूमिका झाली, असे मुंडे यांनी एकापाठोपाठ एक केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. शिवसेना आमदारांना आक्रमक भूमिका घ्यायला सांगणे हा निव्वळ फार्स आहे. विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा लावून धरला आहे.

शिवसेनेने या लढ्यात सामील व्हावे, असे त्यांना आमचे आव्हान आहे. आपल्या आमदारांना आक्रमक भूमिका घ्यायला सांगण्याऐवजी शिवसेनेने आपल्या मंत्र्यांना सरकारमधून बाहेर पडण्यास सांगावे, असेही मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.   बुधवारपासून अधिवेशन पुन्हा सुरू होत आहे. सरकार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करत नाही, तोपर्यंत विधिमंडळाचे कामकाज चालू देऊ नका, असे निर्देश सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना दिले आहेत. 

उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांना दोन्ही सभागृहांत आक्रमक होऊन कामकाज हाणून पाडण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत सभागृहांचे कामकाज होऊ देऊ नका, असा त्यांचा स्पष्ट आदेश आहे, असे शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सोमवारी रत्नागिरी येथे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...