आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena News In Marathi, Babanrao Gholap, Uddhav Thackeray

शिवसेनेचा पोपट,नार्वेकरांपाठोपाठ घोलपांमुळेही उद्धव ठाकरे तोंडघशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शिवसेनेचे आमदार व शिर्डी मतदारसंघातील उमेदवार बबनराव घोलप यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर ते उमेदवारी अर्ज भरण्यास अपात्र ठरले आहेत. त्यामुळे शिवसेनेचा पुन्हा एकदा ‘पोपट’ झाला. खटला चालू असतानाही घोलपांना उमेदवारी देणे असो की राहुल नार्वेकर राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे माहीत असूनही त्यांना विधान परिषदेला उभे करणार्‍या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्णयक्षमतेवरच यानिमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.


घोलप यांना शिक्षा झाल्यानंतर शिवसेना नेतृत्वाने ‘हे असे काही घडेल याची कल्पना होतीच’, अशी प्रतिक्रिया दिली. राहूल नार्वेकर यांनी पक्ष सोडला तेव्हाही ‘ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे आपल्याला माहीत होते,’ असे वक्तव्यही त्यांनी केले होते.


‘पक्षप्रमुखांना हे सारे माहीतच होते, तर अशा नेत्यांना उमेदवारी देऊन आपल्याच पायावर धोंडा का मारून घेतला?’ असा संतप्त सवाल ज्येष्ठ शिवसेना नेत्याने उपस्थित केला. या घडामोडींमुळे व शिवसेनेतील गळती पाहता पक्षनेतृत्वच निर्णय घेण्यास सक्षम नसल्याची चर्चा शिवसेनेतच आहे.


घोलपांवर खटला सुरू असल्याची कल्पाना असताना खरे तर शिर्डीतून डमी उमेदवार द्यायचा आणि घोलपांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवायचे, अशी खेळी शिवसेनेला खेळता आली असती. मात्र, अशा राजकीय डावपेचांत शिवसेनेचे नेतृत्व अजून तरबेज नसल्याचेच यावरून दिसून आले.


घोलप यांच्या जागी नवा उमेदवार देण्याबाबत बैठका सुरू आहेत. घोलप यांची मुलगी नयना वालझडे, लहू कानडे व सदाशिव लोखंडे यांची नावे चर्चेत आहेत. नयना या नाशिकच्या महापौर असताना त्यांच्यावर काही आरोप झाले होते, त्यामुळे त्यांना तिकीट देणे कितपत योग्य ठरेल, यावरही खल झाला. दुसरीकडे, अकोलेतील (जि. नगर) कॉँग्रेस नेते प्रेमानंद रुपवते यांना शिवसेनेत आणून त्यांनाच रिंगणात उतरविण्याचाही प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. नगरचे संपर्क प्रमुख सुहास सामंत यांनी मात्र त्याचे खंडन केले.


खोटा विश्वास नडला !
तिकिट निश्चित करण्यापूर्वी घोलपांवरील आरोपांची चर्चा झाली होती. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने याच कारणामुळे तिकिट न देण्याचाही सल्ला दिला होता. मात्र, आपण सहीसलामत सुटू, असा आशावाद घोलपांनी व्यक्त केला होता. पक्षानेही त्यावर विश्वास टाकला अन् फसगत झाली.