आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shiv Sena News In Marathi, Illegal Land Grabing, Divya Marathi,Uddhav Thackeray

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भूखंडाचे श्रीखंड ओरपल्याचा टीका करणा-या शिवसेनेची मुंबईतील बीपीटी, नौदलाच्या जागेवर डोळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सत्ताधा-यांनी भूखंडाचे श्रीखंड ओरपल्याची टीका करणा-या शिवसेनेचाही आता मुंबईतील मोकळ्या जागांवर डोळा असल्याचे दिसून येत आहे. मुंबईच्या पूर्व भागातील बीपीटी आणि नौदलाची 911 एकर जमीन महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेने योजना आखली आहे. या जागेवर काय बांधणार हे अजून ठरवले नसून अगोदर जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.
पक्षाच्या वर्धापन दिन मेळाव्यात मुंबईसाठी वचननामा प्रकाशित केल्यानंतर शुक्रवारी पत्रकारांना मुंबईच्या योजनांबाबत माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले, मुंबईत जागेची प्रचंड समस्या आहे. त्याच वेळेस मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर बीपीटी आणि नौदलाची जवळजवळ 911 एकर जमीन मोकळी पडलेली आहे. या ठिकाणी रेल्वे लाइन, मोनोरेलची लाइन अशा सुविधा आहेत.
देशाला नौदलाची आवश्यकता आहेच. त्यामुळे त्यांना जागा हवीच, परंतु मोकळी असलेली जमीन मुंबईकरांसाठी वापरता यावी असे आम्हाला वाटते. पूर्व किनारी मार्गाचा विकास करून तेथे अनेक योजना राबवता येतील. मुंबईच्या विकासासाठी कोस्टल रोडची आवश्यकता असून यासाठी आठ ते दहा हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगून उद्धव म्हणाले,
योजना तयार आहे, राज्यात आणि केंद्रात काँग्रेसचेच सरकार असतानाही याचा पाठपुरावा केला नाही. लवासासाठी जसा पाठपुरावा केला तसा या कोस्टल रोडसाठी केला असता तर आतापर्यंत काम सुरु झाले असते अशी टीकाही त्यांनी केली. मुंबईचे सर्व खासदार महायुतीचे असल्याने त्यांच्यामार्फत आम्ही मुंबईच्या योजना केंद्रापर्यंत पोहोचवू आणि त्या मंजूर करण्यासाठी पाठपुरावा ही करू. कोस्टल रोडचा आम्ही पाठपुरावा करणार असून महानगरपालिका हा कोस्टल रोड बांधण्यास सक्षम असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आधी जागा ताब्यात येऊ द्या
या मोकळ्या जागेत कोणत्या योजना राबवणार आहात असे विचारता, उद्धव ठाकरे म्हणाले, अगोदर जागा तर ताब्यात येऊ द्या, त्यानंतर योजनांचा आराखडा तयार करण्यात येईल. मुंबई महापालिकेला या जागेसहित नवीन विकास आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. याबाबतचा प्रस्ताव घेऊन आम्ही लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून सादरीकरण करणार आहोत, असेही ते म्हणाले. राज ठाकरे यांची ब्ल्यूप्रिंट लवकरच येणार आहे, त्याअगोदरच तुम्ही तुमची ब्ल्यूप्रिंट तयार केली का, विचारता उद्धव ठाकरे म्हणाले, कोणी काय केले वा करीत आहे त्याबाबत मला काहीही बोलावयाचे नाही. मुंबईच्या विकासासाठी जे काही करावयाचे आहे ते आम्ही करणारच आहोत आणि त्याची सुरुवात आम्ही केली असल्याचेही त्यांनी सांगितले.