आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena News In Marathi, Lok Sabha Election, Legislative Assembly

देशभरात आलेल्या 'मोदी लाटे'मुळे शिवसेनला संजीवनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचे काय होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. शिवसेनेला खिंडार पडेल, काही जण मनसेत, तर काही जण काँग्रेस-राष्ट्रवादीत जातील, असा कयास लावला जात होता. मात्र, काही अपवाद वगळता शिवसेनेचा गड शाबूत असून अंतर्गत टीकेनंतरही पक्षावरील पकड मजबूत करण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाल्याचे दिसून येते. देशभरात असलेली नरेंद्र मोदींची लाट शिवसेनेला संजीवनी देणारी ठरली असून, लोकसभेच्या यशातून विधानसभेवर भगवा फडकवण्याच्या त्यांच्या स्वप्नांना आणखीनच बळ मिळाले आहे.


देशभरात असलेले काँग्रेसविरोधी वातावरण व नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत होणारी वाढ या दोन्ही गोष्टींच्या भांडवलावर शिवसेनेने पुन्हा उभारी घेतलेली दिसते. मराठी माणसासाठी सक्षम पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केल्याने त्यांना एक नव्हे, तर दहा पावले मागे जावे लागले आणि मोदींचे नेतृत्व मान्य करून उद्धव ठाकरेंनी भाजपशी गेल्या अनेक वर्षांपासून असलेला मैत्रीचा धर्म निभावला, याचा त्यांना भविष्यात फायदाच होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटते.


उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून गेल्या काही दिवसांत शिवसेनेच्या चार- दोन नेत्यांनी शिवबंधन झुगारून हातावर घड्याळ बांधले, तर आणखी काही विद्यमान खासदारही पक्षत्यागाच्या तयारीत होते. मात्र, मोदींच्या लाटेमुळे त्यांनी शिवसेनेतच राहणे पसंत केले. मात्र, या फाटाफुटीमुळे तसूभरही न डगमगता उद्धव ठाकरे यांनी तरुण पदाधिका-यांच्या जोरावर पक्ष अधिक मजबूत कसा होईल याकडे लक्ष दिले आहे. बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्याचे भावनिक आवाहन करत तळागाळातील कार्यकर्त्यांनाही पक्षाशी बांधून ठेवण्यात त्यांना यश आल्याचे दिसते.


‘मवाळ’तेची सवय
उद्धव ठाकरे यांचा प्रवास खरोखरच विलक्षण आहे. मुळातच मवाळ नेतृत्व हा शिवसेनेचा स्वभावच नाही. शिवसैनिकांना व बाळासाहेबांवर प्रेम करणा-या जनतेला रस्त्यावर उतरणारी शिवसेना हवी आहे. मात्र, तरीही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना उगाचच रस्त्यावर आणले नाही. त्यांच्या या कार्यपद्धतीचीही पक्षाला आता हळूहळू सवय होऊ लागली आहे. भविष्यात सत्ता येण्याच्या आशेने का होईना, आजही बहुतांश प्रमुख व जुन्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचे नेतृत्व मान्य केल्याचे दिसून येते.


मुरब्बी राजकारणी
स्थापनेपासूनच शिवसेनेसोबत असलेल्या मनोहर जोशी यांनी नेतृत्वावर टीकास्त्र सोडताच उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने त्यांना ‘साइडलाइन’ केले त्यातून त्यांच्या चतुरपणाचे दर्शन घडते. दसरा मेळाव्यात मनोहर जोशींना व्यासपीठावरून पायउतार होण्याची वेळ येणे, त्यानंतर लेखी माफीनामा देण्याची वेळ आणणे यावरून शिवसेनेत अजूनही ठाकरेंचाच शब्द अंतिम असल्याचे ठसवण्यात उद्धव यशस्वी ठरले. अर्थात उद्धव यांचे नेतृत्व भक्कम करण्यासाठीच पडद्यामागे हा खेळ खेळला गेला, असेही म्हटले जाते, तरीही यातूनही मुरब्बी राजकारणी हा त्यांचा नवा पैलू समोर आलेला आहे.


गोपीनाथ मुंडे- ठाकरे सख्य
केंद्रात मोदींचे सरकार येण्याची हवा गेल्या वर्षभरापासून आहे. त्यामुळे महाराष्टÑात भाजपप्रमाणेच शिवसेनेतही प्राण फुंकले गेले आहेत. फीनिक्स भरारीसाठी हीच चांगली संधी असल्याचे ओळखून उद्धव ठाकरे व भाजपने एकमेकांशी जुळवून घेण्याचाच प्रयत्न केला. जागा वाटपात किंवा महायुतीचा विस्तार करताना कोणतीही आडकाठी आणली नाही. पूर्वी बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांचे जसे सख्य होते, अगदी तसेच आता उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडेंचे संबंध आहेत. नरेंद्र मोदींच्या झंझावातात शिवसेनेला राज्यात भाजपपेक्षा जास्त जागा मिळवता येऊ शकतील, याची उद्धव ठाकरे यांना पूर्ण खात्री आहे. त्यामुळे ही संधी वाया न घालवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.


जुन्या- नव्यांचा मेळ
बंडखोरीच्या धास्तीने मागील निवडणुकीत शिवसेनेने सगळ्यात शेवटी उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यंदा मात्र उद्धव ठाकरे यांना प्रचंड विश्वास असल्याने सर्वात आधी, फार उशीर न करता तातडीने यादी जाहीर केली. मनोहर जोशी, मोहन रावले यांच्यासारख्या जनाधार संपुष्टात आलेल्या ज्येष्ठांना बाजूला सारतानाच चंद्रकांत खैरे, विनायक राऊत, गजानन कीर्तिकर, आनंदराव आडसूळ यांसारख्या ज्येष्ठांना व काही नव्या दमाच्या नेत्यांना उमेदवारी देऊन उद्धव यांनी पक्षात जुन्या- नव्यांचा मेळ साधण्याची किमया साधली आहे.


नजर मुख्यमंत्रिपदाकडे
लोकसभेला जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याबरोबरच विधानसभा निवडणुकीत भाजपपेक्षा जास्त जागा जिंकण्याचे ध्येयही उद्धव ठाकरे यांनी ठेवले आहे. अलिबागमधील कार्यकर्ता अधिवेशनात आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंचे सरकार राज्यात येईल, असे सांगत त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचे सूतोवाचच केले होते. उद्धव ठाकरे यांनाही मुख्यमंत्रिपदाची खुर्ची खुणावत आहे. ज्यांच्या जागा जास्त, त्यांचाच मुख्यमंत्री, हे युतीचे सूत्र असल्याने उद्या जास्त जागा आल्यान गोपीनाथ मुंडेही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदापासून रोखू शकणार नाहीत. एकूणच मरगळ आलेल्या शिवसेनेला संजीवनी मिळाल्याने उद्धव ठाकरेंसह सर्वच जुने- नवे नेते राज्यातही सत्ता स्थापनेचे स्वप्न पाहू लागले आहेत आणि याच आशेने सामान्य शिवसैनिकांतही जोश संचारलेला दिसतो.


मराठवाड्यातून आशा
मराठवाड्यातील आठपैकी चार मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आलेले आहेत. त्यापैकी औरंगाबाद, हिंगोली व परभणी मतदारसंघात गतवेळी पक्षाने विजय मिळवला होता. त्यामुळे यंदाही या भागातून पक्षाला मोठ्या आशा आहेत.


48 लोकसभेच्या
एकूण जागा
11 राज्यातील विद्यमान सेना खासदारांची संख्या
22 पैकी 20 जागा यंदा शिवसेना लढवणार
01 जागा प्रत्येकी रिपाइं व राजू शेट्टींसाठी सोडली
अदलाबदल : भिवंडीच्या जागेसाठी उस्मानाबादची जागा मित्रपक्ष भाजपला सोडली.