मुंबई -
अमित शहा यांनी अनुल्लेखाने मारत शिवसेनेला डिवचले. त्यामुळे शिवसेना नेत्यांत संतापाची लाट उसळली. त्यातच केंद्रात एकच मंत्रिपद दिल्याने शिवसेनेत असलेला रोषही उफाळून आला. उद्धव ठाकरे यांनी सकाळी बोलावलेली शिवसेना नेत्यांची बैठक सायंकाळी झाली. दिवाकर रावते, लीलाधर डाके, सुभाष देसाई, रामदास कदम, संजय राऊत हे नेते बैठकीला होते.
सुमारे सव्वा तास चाललेल्या बैठकीत शाह यांचे वक्तव्य आिण भाजपाची जास्त जागांची मागणी यावर चर्चा झाली. युती तुटू द्यायची नाही मात्र भाजपाला जास्त जागा द्यायच्या नाहीत, असा पवित्रा उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यास सर्व नेत्यांनी पाठिंबा दिला.
भाजपचा तोरा दिल्लीतील नेत्यांच्या जोरावर
- शिवसेनेतील एक नेते म्हणाले की, लोकसभेतील यशामुळे भाजप हवेत होती. पोटनिवडणुकीतील अपयशानेही त्यांचा तोरा कमी झाला नाही. राज्यात आमची ताकद असतानाही दिल्लीतील नेत्यांच्या जोरावर आम्हाला डोळे दाखवण्याचे काम भाजप करत होती. परंतु राज्यात शिवसेनेचाच आवाज चालणार हेच आम्ही भाजपला दाखवून देणार आहोत. भाजप जमिनीवर आल्यास ठीक नाही तर स्वबळावर निवडणूक लढण्यासही आम्ही मागे-पुढे पाहणार नाही. उद्धव ठाकरेही यासाठी तयार आहेत.
एकाच मंत्रिपदावर बोळवण
लोकसभेच्या वेळी शिवसेनेने सर्व शक्तिनिशी
नरेंद्र मोदी यांना मदत केली. पूर्ण सत्ता आल्यावरही मोदी यांनी शिवसेनेची फक्त एकाच मंत्रिपदावर बोळवण केली. आम्ही तीन पदे मागितली होती; पण मोदी यांनी उद्धव ठाकरेंचेही ऐकले नाही. तशातही भाजप नेते शिवसेनेवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आम्हाला मान्य नाही, असा नेत्यांचा सूर निघाला. उद्धव बाळासाहेबांसारखी भूमिका वठवू पाहत आहेत; पण ती भाजप नेत्यांच्या पचनी पडत नाही. यातूनच वाद धुमसत आहे.