आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena News In Marathi, Rahul Narvekar, Balasaheb Thackeray

'राहुल नार्वेकरांसारख्या चमको नेत्यांनीच शिवसेनेचा घात केला'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळात शिवसेना म्हणजे एक बंधन होते आणि त्यासाठी कुठल्याही शिवबंधनाची गरज नव्हती. बाळासाहेबांच्या एका आदेशाने शिवसैनिकच नव्हे, तर नेतेही बस म्हटले बसत आणि ऊठ म्हटले की ऊठत. शिवसेनेत लोकशाही नाही, हे ओरडून सांगण्याची त्या वेळी गरज नव्हती... पण बाळासाहेबांकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्वाची धुरा गेल्यानंतर दरबारी चाणक्य मंडळींचा शब्द प्रमाण झाला आणि चमको नेत्यांचा उदो उदो झाला... विशेष म्हणजे, अशा लोकांनीच शिवसेनेचा घात केला हे शिवसेनेला ‘जय महाराष्‍ट्र’ करून राष्‍ट्रवादीच्या तंबूत दाखल झालेल्या राहुल नार्वेकरांनी दाखवून दिले आहे.
बोलण्यात चतुर, त्यातच अ‍ॅडव्होकेट असल्याने नार्वेकरांनी आदित्य ठाकरेंशी संधान बांधून मातोश्रीवर वजन उंचावले. आदेश बांदेकर, श्वेता परुळेकर यांच्या टीममध्ये प्रवेश केलेल्या राहुल नार्वेकर यांचे वडील खरे तर काँग्रेसचे नगरसेवक. कुलाब्यामधून चार वेळा ते निवडून आलेले. घरची श्रीमंती आणि सुरुवातीपासून राजकीय नेत्यांमध्ये ऊठबस असल्याने राहुल नार्वेकरांना राजकारणाची चांगलीच शिकवण होती. म्हणूनच मुंबई महापालिका निवडणुकीत आपला भाऊ मकरंद नार्वेकर यांना शिवसेना जागा देत नाही, हे लक्षात आल्यानंतर त्याला अपक्ष म्हणून निवडूनही आणले. इतकेच नव्हे, तर शिवसेनेच्या नगरसेवकांना बाजूला सारून विधी समितीचे अध्यक्षही केले.
आदित्य ठाकरे यांच्या अट्टहासामुळे ज्येष्ठ नेत्यांना डावलून राहुल यांना झटपट पदे मिळाली. युवा सेना नेते, शिवसेनेच्या प्रवक्तेपदामुळे नार्वेकर कायम प्रकाशझोतात राहिले. मात्र, त्याच वेळी पक्षासाठी खस्ता खाल्लेल्यांना दुय्यम फळीतच समाधान मानण्याची वेळ आली. अ‍ॅडव्होकेट असल्याने हजरजबाबीपणा, त्यातच इंग्लिश बोलता येत असल्याने चॅनलवरून पक्षाची भूमिका मांडण्यासाठी पक्षाला त्यांच्या रूपाने एकमेव नेता मिळाल्याने नार्वेकरांना आभाळाला हात टेकल्यासारखे
वाटू लागले होते. रायगड जिल्ह्यातील उरणमधील नार्वेकरांना खरे तर लोकसभा लढवण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी मनोहर जोशी यांना हाताशी घेऊन आधी रत्नागिरी, रायगडचे खासदार अनंत गितेंविरोधात षड्यंत्र रचून पाहिले. मात्र, नार्वेकरांची तेथे डाळ शिजू शकली नाही. त्यानंतर त्यांना विधानसभेसाठी दक्षिण मुंबईतून उमेदवारी दिली. मात्र, तेथे काँग्रेसने त्यांचा पराभव केला. याच वेळी शिवसेनेतून राष्‍ट्रवादीत आलेल्या किरण पावसकरांचीही नार्वेकर यांना मोठी मदत झाली.
केवळ पदांसाठी पक्षात आलेल्या आयाराम गयारामांनी गेल्या काही वर्षांत शिवसेनेचा विश्वासघात केला आहे. पक्षातील नेतेच नव्हे, तर कार्यकर्तेही काय कार्य करत आहेत, याची माहिती घेण्याचे बाळासाहेबांचे स्वत:चे नेटवर्क होते; पण उद्धव ठाकरे यांनी दरबारी तसेच काही मोजक्या नेत्यांच्याही पलीकडे राज्याच्या कानाकोप-यात शिवसेना आहे, हे वास्तव लक्षात घेतलेले नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे शिवबंधनाला गेलेला तडा आहे.
पराभवाच्या भीतीने माघार
खरे तर पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांच्या तुलनेत उणी पुरी काही वर्षे पक्षात येऊन झाली असताना शिवसेनेने नार्वेकरांसाठी खूप काही दिले; पण आपल्याला काहीतरी मिळाले पाहिजे, या अट्टहासापायी नार्वेकर शेवटी विधान परिषद निवडणुकीला उभे राहिले. शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून येणे अशक्य होते. मात्र, तरीही आपण ही जागा जिंकून आणू, असा पक्षश्रेष्ठींना विश्वास देत त्यांनी अर्ज भरला; पण जिंकून येणे शक्य होत नाही, हे लक्षात येताच शिवसेनेने त्यांना माघार घेण्यास सांगितली. मात्र, विश्वासात न घेता माघार घेण्यास लावल्याने नार्वेकर दुखावले. त्यांनी उद्धव यांना न कळवताच माघार घेतली.
निंबाळकरांचे वजन कामी
नार्वेकरांची महत्त्वाकांक्षा प्रचंड होती. राष्‍ट्रवादीचे माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांचे जावई असलेल्या नार्वेकरांना विधान परिषदेसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीच शिवसेनेला ‘जय महाराष्‍ट्र’ करून राष्‍ट्रवादीत जायचे होते. पण त्यांना वाट पाहण्याची सूचना देण्यात आली. निंबाळकरांचे वजन कामाला आले आणि त्यांना मावळमधून थेट लोकसभेची उमेदवारी मिळाली.