आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘निझाम’ म्हणणाऱ्यांनी औरंगजेबासारखे वागू नये, भाजपचे प्रवक्ते कदमांंचा सेनेला टोला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘तहानलेल्या मराठवाड्याला पाणी देऊ नका म्हणून नाशकात मोर्चा काढणाऱ्या शिवसेनेने इतरांना ‘निझाम’ म्हणताना आपण ‘औरंगजेबासारखे’ वागू नये,’ असे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेश प्रवक्ते व अामदार राम कदम यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिले.

अाैरंगाबाद येथील कार्यक्रमात खासदार राऊत यांनी ‘भाजपचे सरकार म्हणजे निझामाचा बाप’ असल्याची टीका केली हाेती. त्याला प्रत्युत्तर देताना कदम म्हणाले, ‘मराठवाड्यातील दुष्काळावरून प्रवचन देणारे शिवसेनेचे नेते हे विसरले की, त्यांच्या पक्षाने नाशिकमध्ये मोर्चा काढून तहानलेल्या मराठवाड्यासाठी नाशकातील धरणातून पाणी सोडण्यास विरोध केला होता. शिवसेना दुटप्पीपणाने वागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे शिवसेनेचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत निवडून आले व त्या पक्षाला केंद्रातील सत्तेत स्थान मिळाले. राज्यात भाजपच्या आधारामुळे शिवसेनेला सत्तेत वाटा मिळाला आहे. तरीही तो पक्ष एकीकडे सत्तेचा लाभ घेतानाच भाजपवर टीका करतो हे त्यांच्या दुटप्पीपणाला साजेसेच आहे. शिवसेनेचा दुटप्पीपणा न समजायला जनता दुधखुळी नाही. हे दुटप्पी वागणे बरे नव्हे,’ असे कदम म्हणाले.

‘राज्यात शिवसेनेची लाट आहे व आता निवडणुका झाल्यास १८० जागा मिळतील’, अशी वल्गना राऊत यांनी केली आहे. गेल्या वर्षी तेथील महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या जागा कमी झाल्या होत्या, तर भाजपच्या वाढल्या होत्या याचा राऊत यांना विसर पडलेला दिसतो,’ असा टाेलाही अामदार कदम यांनी लगावला.