आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Not Give Up Power At Centre And Mumbai Raj Thackeray

अपमान होऊनही सेनेला केंद्र, मुंबईतील सत्ता सोडवेना, राज ठाकरेंचा हल्लाबोल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महायुती तोडून एवढा अपमान केला तरीही केंद्रात मंत्रिपद ठेवलंय आणि इन्कममुळे तुम्हाला महापालिकेतली सत्ताही सोडवत नाही, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी आपल्या पहिल्याच प्रचारसभेत शिवसेनेवर थेट हल्ला चढवला. भाजपही भरवसा ठेवण्यालायक पक्ष नसल्याचे सांगत भाजपलाही खडे बोल सुनावले. यावरून प्रचारात राज यांच्या टीकेचा भर शिवसेना, भाजपवरच राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

जागावाटपावरून महायुती, आघाडीतील गोंधळावर राज यांनी हल्लाबोल केला. भाजपला महायुती तोडायचीच होती. महिनाभर आधी हे मला कळले होते, ते उद्धवला का कळू नये, असा सवाल करून या जागी बाळासाहेब असते तर त्यांनी या लोकांना केव्हाच लाथ घालती असती, असा टोला राज यांनी लगावला. शरद पवारांनी एका भाजप नेत्याला फोन करून महिनाभर आधीच सांगितले होते की, तुम्ही युती तोडा. मी लगेच आघाडीतून बाहेर पडतो, असा गौप्यस्फोट राज यांनी केला. भाजप व राष्ट्रवादीत साटेलोटे असल्याचा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी केला.

प्रत्येक मराठी माणसाला परवडणारे हक्काचे घर, महिलेच्या नावे घर केल्यास सर्व कर माफ, स्वायत्त राज्याची संकल्पना, पोलिसांच्या मदतीसाठी सिक्युरिटी एजन्सी अशा ब्ल्यू प्रिंटमधील संकल्पनाही राज यांनी पुन्हा मांडल्या. सत्ता दिल्यास माझ्या सत्तेेचा पहिला दिवस हा या राज्यातल्या नव्या झोपडपट्ट्यांचा शेवटचा दिवस असेल असा दावाही त्यांनी केला.

लाज का वाटली नाही
राम कदम यांचा भाजपप्रवेशही राज यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसले. गेल्या विधानसभेच्या वेळी भाजपचे अतुल भातखळकर व सदाशिव लोखंडे हे तिकिटासाठी मला भेटले. तेव्हा मी नितीन गडकरींच्या कानावर हा प्रकार घातला होता. मग माझा आमदार मला न सांगता घेऊन जाताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही, असा उद्विग्न सवाल राज यांनी भाजपला केला.

बाटली नवी, दारू जुनी
राज यांनी पुन्हा परप्रांतीय विरोधाचा मुद्दा मांडला. हे राज्य माझ्या हाती आले तर बाहेरून येणा-यांवर करडी नजर असेल. कुणी वेडावाकडा येऊच देणार नाही. हे लोक बाहेरून येणार, आमच्या मुलांच्या नोक-या बळकावणार आणि आमची मुले मात्र हार्ट अटॅकने मरणार असे सांगत राज यांनी मुंबई पोलीस भरतीच्या वेळी उमेदवारांच्या मृत्यूच्या घटनेचा उल्लेख केला.