आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघ बंडखोरांबरोबर युतीची शिवसेनेकडून गोव्यात तयारी, वेलिंगकर यांनी पुढाकार घ्यावा : राऊत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात शिवसेना वाढवण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तयारी केली असून त्याचाच एक भाग म्हणून गोव्याची सत्ता काबिज करण्यासाठी शिवसेना विविध उपाययोजना करणार आहे. गोव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात झालेल्या बंडाळीचा फायदा घेत संघाच्या बंडखोरांबरोबर युती करण्यास शिवसेना तयार झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबतचे वक्तव्य करत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. राऊत यांच्यावर गोव्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी राऊत यांनी वेलिंगकर यांची भेट घेऊन चर्चा केली होती. सोमवारी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, वेलिंगकर यांनी मातृभाषेसंदर्भात जी भूमिका घेतली आहे, या विचारांशी निष्ठा राखणारे समविचारी पक्ष किंवा संघटना एकत्र आल्या आणि अशी युती झाली तर ती गोव्याच्या परिवर्तनासाठी फायद्याची ठरेल. वेलिंगकर यांनी याबाबत पुढाकार घ्यावा, नेतृत्व करावे. हा विषय राजकारणाचा नाही तर सांस्कृतिक रक्षणाचा आहे. जर त्यांनी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर प्रसंगी आम्ही दोन पावले मागे येऊ आणि त्यांच्यासोबत युती करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. गोव्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. भारतीय जनता पक्षाबरोबर युती करण्याऐवजी शिवसेना गोव्यात स्वबळावर निवडणुका लढवण्याची तयारी करत आहे. यासाठी संजय राऊत गेले काही महिने सतत गोव्यात जाऊन बैठका घेत आहेत. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात फूट पडल्याने भाजपापुढील डोकेदुखी आणखी वाढली आहे. संघात पडलेल्या फुटीचा फायदा घेण्याचा प्रयत्न शिवसेना करत असून यासाठी सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्यात शिवसेना तयार झाली आहे.