आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena President Udhav Thackeray Meet To State CM Chavan Of Rase Corrce Land

रेसकोर्सचे अडले ‘घोडे’; उद्धव ठाकरे यांनी घेतली पृथ्वीराज चव्हाण यांची भेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महालक्ष्मी रेसकोर्सवरून सुरू झालेला राजकीय वाद अद्याप थांबण्याची चिन्हे नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची ‘वर्षा’ या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना या जागेवरील थीम पार्क बनवण्याचा आराखडा सादर केला. रेसकोर्सच्या जागेचा भाडेपट्टा 31 मे रोजी संपुष्टात आला असून तो वाढवण्याबाबत काहीही हालचाली झालेल्या नाहीत. शिवसेनेने या जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ थीम पार्क उभारण्याची मागणी लावून धरली आहे.

आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना रेसकोर्सच्या जागी थीम पार्क उभारण्यासाठी आराखडा दिल्याचे उद्धव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 99 वर्षांनंतर मुंबईतील लोकांना या जागेची मालकी परत मिळाली असून त्यांच्यासाठी ही जागा खुली करण्याची एक संधी असल्याचे ते म्हणाले. उद्धव यांच्यासोबत आमदार सुभाष देसाई, महापौर सुनील प्रभू आणि स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे होते. उद्धव यांनी दिलेल्या आराखड्यामध्ये कोणत्याही प्रकारचे नवीन बांधकाम नसून झाडे, कारंजी आदींचा समावेश आहे. तसेच चालण्यासाठी, धावण्यासाठी वेगळा ट्रॅक, योगा, ध्यानधारणेसाठी वेगळी जागा अशी व्यवस्था केली आहे. एक खुला रंगमंचही आराखड्यामध्ये दाखवला असून शेतकर्‍यांचा बाजार आणि कलाप्रदर्शनासाठी जागा ठेवण्यात आली आहे.

राष्ट्रवादीकडून मात्र विरोधच
मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आधीच त्या जागेवर रेसकोर्सच असावा, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे तिथे थीम पार्क उभारण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असणार हे उघडच आहे. तसेच रेसकोर्सच्या 8.5 लाख चौरस मीटर जागेपैकी 6 लाख चौरस मीटर जागा ही राज्य सरकारच्या मालकीची असल्याने एकट्या काँग्रेसला हा निर्णय घेणे शक्य होणार नाही.

मुख्यमंत्री सर्व पक्षांशी चर्चा करणार
रेसकोर्सच्या मैदानावर थीम पार्क उभारण्याबाबत सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. थीम पार्कची संकल्पना चांगली असून यावर चर्चा करण्यासाठी सर्व पक्षांना बोलावले जाईल. तसेच ही जमीन मुंबईकरांची आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली.