आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयमध्ये शिवसेनेचा राडा, पाकिस्तानसोबतचे क्रिकेट सामने पुन्हा सुरू करण्यास विरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारत- पाकिस्तान दरम्यानचे क्रिकेट सामने पुन्हा सुरू करण्यासाठी होत असलेल्या बोलणीच्या विरोधात शिवसेनेने सोमवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मुख्यालयात घुसखोरी करून प्रचंड घोषणाबाजी केली. पोलिसांनी या प्रकरणी दहा शिवसैनिकांना अटक केली होती. सायंकाळी या सगळ्यांची दोन हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली.

भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा क्रिकेटचे सामने व्हावेत म्हणून बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी पाकिस्तान क्रिकेड बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांना मुंबईत बैठकीसाठी आमंत्रित केले होते. शिवसेनेला याची माहिती मिळताच सकाळीच शेकडो शिवसैनिक बीसीसीआय कार्यालयाजवळ जमा झाले. शहरयार यांचा निषेध करणारे फलक हातात घेऊन हे शिवसैनिक बीसीसीआयच्या कार्यालयात 'पाकिस्तान मुर्दाबाद', 'शहरयार खान गो बॅक' व 'मनोहर शशांक मुर्दाबाद' अशा घोषणा देत शिरले. शशांक मनोहर यांनी शिवसैनिकांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले, मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. शिवसैनिकांच्या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी बीसीसीआयभोवती कडे उभारले आणि शिवसैनिकांना अटक केली. शिवसेनेच्या आंदोलनानंतर शशांक मनोहर यांनी शहरियार खान यांच्यासोबतची बैठक रद्द केली.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसैनिकांच्या आंदोलनाचे समर्थन करताना म्हटले की, शिवेनेने केलेले आंदोलन ही देशाचीच भावना आहे. भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट वा अन्य कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवले जाऊ नयेत ही शिवसेनेची भूमिका आहे, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत म्हणाले.भारत-पाकिस्तान सामने झाले नाहीत तर आभाळ कोसळणार नाही, असे भाजप प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले.भारत-पाकिस्तानदरम्यान क्रिकेटचे सामने व्हावेत असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले.