मुंबई - राज्य आणि केंद्रातील सत्तेत भाजपकडून मानाचे पान मिळत नसल्याने अस्वस्थ शिवसेनेने भाजपवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्यास शिवसेना सरकार स्थापन करू शकते, असा नवा प्रस्ताव दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे, मात्र केंद्रात भाजपची सत्ता असल्याने भविष्यात चौकशांचा ससेमिरा लागू नये म्हणून राष्ट्रवादीने हा प्रस्ताव स्पष्ट शब्दात फेटाळून लावल्याने भाजपची कोंडी करण्याचे शिवसेनेचे प्रयत्न त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या सहा आमदारांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना सरकार स्थापण्यासाठी आणि त्यापूर्वी विधानसभा अध्यक्ष निवडीच्यावेळेस संयुक्त उमेदवार उभा करण्याचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर अजित पवारांना भेटणा-या आमदारांमध्ये एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि अर्जुन खोतकर यांचा समावेश असल्याचे समजते.शिवसेनेचे अनेक आमदार गटा-गटाने राष्ट्रवादीच्या
प्रमुख नेत्यांच्या भेटी घेत असून त्यांना ही योजना पटवून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवसेना-राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे आणि काँग्रेसने त्यांना बाहेरून पाठिंबा द्यावा असा खटाटोप शिवसेनेने चालवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीही भाजपाबरोबर दुहेरी गेम खेळत आहे का असा प्रश्नही राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागला आहे. मात्र या घडामोडींची कुणकुण लागताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा नाही, भाजपला पाठिंबा देण्याच्या भूमिकेत बदल नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितल्याने शिवसेनेची पंचाईत झाली.विश्वासदर्शक ठरावापुर्वीच विधानसभा अध्यक्ष निवडीच्या अग्निपरीक्षेत सरकारला अनुत्तीर्ण करण्याचे डाव शिवसेनेने राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या आशेवर आखले आहेत.
निकालानंतर लगेचच राष्ट्रवादीने भाजपला विनाअट पाठिंबा जाहीर करून शिवसेनेची कोंडी केली होती. राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळणार असल्याने भाजपने शिवसेनेला सत्तेत सहभागावरून झुलवत ठेवले आणि राज्यातील नेत्यांनी चेंडू दिल्लीच्या नेत्यांकडे फेकला. अशातच गुरुवारी भाजपने शिवसेनेला केंद्रात दोन अतिरिक्त मंत्रिपदे देऊ करून शुक्रवारपर्यंत श नावे मागितली मात्र शिवसेनेने ती दिलीच नाहीत. शिवसेना प्रथम राज्यात सत्तेत योग्य वाटा मागत असून त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. भाजपाने सत्तेत वाटा दिला नाही तर पुढील रणनीतिही तयार केली आहे.
कुणाला काय फायदा?
शिवसेना: शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा अशी बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. ती उद्ध व ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास पूर्ण होईल.
राष्ट्रवादी : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सिंचन घोटाळ्यात अडकण्याची शक्यता असल्याने चौकशीचा ससेमिरा टाळणे हा एनसीपीचा हेतू.
कॉंग्रेस: भाजपला सत्तेपासून रोखणे आणि
नरेंद्र मोदी आणि
अमित शहा यांना शह देण्याचा कॉंग्रेसचा मनसुबा पूर्ण होईल.
नवा फॉर्म्युला : काँग्रेसच्या पाठिंब्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार
*अजित पवार यांच्याशी सत्ता स्थापन करण्याबरोबरच विधानसभा अध्यक्षपदही भाजपला मिळू देऊ नये यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. सूत्रांनी सांगितले की, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन काँग्रेसने बाहेरून पाठिंबा द्यावा यावर पवार यांच्याशी चर्चा झाली.
*विश्वासदर्शक ठरावावेळी शिवसेना राष्ट्रवादीने एकत्र यायचे आणि विरोधात मतदान करायचे. त्यानंतर सरकार पडल्यानंतर या दोघांनी सत्ता स्थापन करायची आणि काँग्रेसने बाहेरून पाठिंबा द्यायचा अशी योजना तयार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
*शिवसेना-राष्ट्रवादी सरकारला पाठिंबा देणार नाही, असे काँग्रेसने यापूर्वीच म्हटले आहे. मात्र भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस या योजनेला पाठिंबा देईल असे म्हटले जात आहे.
भाजपचा पर्यायी गेमप्लॅन : काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील
आपल्या १५ समर्थक आमदारांसह काँग्रेसमधून बाहेर पडण्याची योजना तयार केली असल्याचे वृत्त आहे. ते एकनाथ खडसे यांच्या संपर्कात असल्याचेही समजते. त्यामुळे भाजपानेही आपली दुसरा गेम प्लॅन तयार केल्याने आपणाला सत्तेपासून कोणी रोखणार नाही असा विश्वास भाजप नेते व्यक्त करीत आहेत.
भाजपचा डाव
शिवसेनेची केंद्रातील दोन मंत्रिपदांवर बोळवण करून भाजपला फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घ्यायचा आहे. एकदा बहुमत सिद्ध झाले की त्यानंतर किमान ६ महिने शिवसेनेला अविश्वास ठराव आणता येणार नाही. पाठिंबा काढल्याचे पत्र शिवसेनेने राज्यपालांना दिले तरीही शिवसेनेला लगेचच विरोधी पक्ष नेतेपदी मिळू नये, अशी भाजपची खेळी आहे.
शिवसेनेचा प्रतिडाव
विश्वासदर्शक ठरावानंतर भाजपने सत्तेत योग्य वाटा दिला नाही तर विरोधी पक्षनेतेपद राखण्याची शिवसेनेची रणनीती आहे. भाजपचा विधानसभाध्यक्ष असेल तर हे पद मिळण्यात अडचणी येऊ शकतात,म्हणून भाजपकडे ते पद जाऊ नये यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी याच मुद्द्यावर अजित पवार यांच्याशी खलबते केल्याचे सांगण्यात येते.