आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेनेच्या टेलिमेडिसिनची भाजपच्या नेत्यांना ‘अ‍ॅलर्जी’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘शिवसेना- भाजप’मध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगत असले तरी या सत्ताधारी मित्रपक्षांमधील दुरावा पावलाेपावली जाणवत आहे. उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या ‘शिव आरोग्य सेवा’ या योजनेचे सोमवारी त्यांच्याच हस्ते लोकर्पण करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचा एकही मंत्री अथवा पदाधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे हा कार्यक्रम संपूर्णपणे शिवसेनेचाच असल्याचे दिसून आले.

दुसरीकडे, भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनीही हा सरकारचा नव्हे तर पक्षीय कार्यक्रम असल्याचे सांगत अशा कार्यक्रमांना उपस्थित राहताना नोकरशहांनी विवेक बाळगावा, अशी प्रतिक्रिया दिली. विधानसभा िनवडणुकीपूर्वी शिवसेनेने शिव आरोग्य सेवेची घोषणा केली होती.

टेलीमेडिसीनच्या माध्यमातून ग्रामीण, दुर्गभ भागातील रुग्णांवर शहरातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार कसे केले जाऊ शकतात याचे प्रात्यक्षिकही उद्धव ठाकरे यांनी त्या वेळी शिवसेना भवनात पत्रकारांना दाखवले होते. सत्ता आल्यावर ही योजना प्राधान्याने राबवू असे म्हटले होते. त्यानुसार शिव आरोग्यसेवा योजनेचा सोमवारी शुभारंभ करण्यात आला. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत या शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत या योजनेचे लोकार्पण करण्यात आले. सरकारच्या मदतीने ही योजना राबवली जात असल्याचे ठाकरे म्हणाले. तर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मात्र ‘टेलिमेडिसिन योजना शिवसेनेचीच असून सरकार त्यात नंतर सहभागी होऊ शकते,’ असे स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला प्रधान सचिव सुजाता सौनिक, एनआरएचएमच्या व्यवस्थापकीय संचालक आय.ए. कुंदन, आरोग्य सेवेचे संचालक डॉ. सतीश पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा : उद्धव ठाकरे
‘ही योजना सरकारची की शिवसेनेची?’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, त्यावर उद्धव म्हणाले की, ‘निवडणुकीआधी ही योजना आम्ही जनतेसमोर मांडली होती. सरकार आल्यानंतर योजना लागू करू, असे आश्वासन दिले होते. त्या वचनानुसार योजना तयार असल्याने अधिकचा वेळ न घालवता पुढाकार घेऊन ती सुरू केली तर चुकले कुठे?’ असा प्रश्न विचारतानाच राज्य सरकारने ही योजनेसाठी पूर्ण मदतीचे आश्वासन दिल्याचेही ते म्हणाले. या योजनेसाठी सरकारबरोबरच खासगी डॉक्टरांच्या मदतीची गरज लागणार आहे. त्यामुळे योजना सरकारची की आमची असा वाद निर्माण न करता ती जनतेसाठी आहे हे महत्त्वाचे. मुख्यमंत्र्यांना आज कार्यक्रमाला येणे शक्य न झाल्याने त्यांनी शुभेच्छा संदेश पाठवला आहे. पुढच्या वेळी नक्की उपस्थित राहीन, असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे ठाकरे म्हणाले.

अधिकार्‍यांनी विवेक बाळगावा : भंडारी
कार्यक्रमात भाजपला समाविष्ट न केल्याबद्दल भाजप प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले, ‘टेलिमेडिसिन पहिल्यांदाच राबवले जात आहे, असे नाही. अनेक खासगी ठिकाणी ही योजना राबवली गेली आहे. शिवसेना ही सेवा समाजासाठी करत असेल तर ती चांगलेच आहे.’ सरकारी अधिकार्‍यांच्या उपस्थितीबाबत भंडारी म्हणाले, हा सरकारी कार्यक्रम नव्हता, पक्षाचा होता तर तिथे जाण्याबाबत नोकरशहांनी विवेक बाळगायला हवा होता.’